शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय हे कोविड किंवा नॉन कोविड करावे, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सुरक्षेची सर्व साधने पुरवावीत, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी डॉक्टर, कर्मचारी आणि सफाई कर्मचारी काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यात होते. ते सर्वच प्रवेशद्वारावर एकवटले असतांना अधिष्ठाता डॉ.नागसेन रामराजे यांनी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची मनधरणी करुन शांत केले.

आठवडय़ापासून महाविद्यालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि सफाई कामगारांमध्ये सुरक्षेसह विविध गंभीर कारणांनी खदखद आहे. कोविड कक्षासोबतच हिरे महाविद्यालयात अन्य विभाग कार्यरत असल्याने तेथील डॉक्टर, कर्मचारी आणि सफाई कामगारांना करोना संसर्गाचा धोका वाढला आहे. कोविड कक्षातून काम करणारे डॉक्टर व कर्मचारी यांचा अन्य विभागात काम करणाऱ्या डॉक्टर कर्मचाऱ्यांशी काही वेळेला संपर्क होऊ  शकतो. तसेच करोना रुग्णाच्या नातेवाईकांचाही येथे वावर असतो.

शिवाय, अन्य रुग्णही येथे उपचार घेत असल्याने त्यांनाही संसर्गाचा धोका आहे. यासंदर्भात गुरुवारपर्यंत निर्णय न झाल्याने अखेर डॉक्टर आणि कर्मचारी काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यात होते. ही माहिती अधिष्ठाता डॉ.नागसेन रामराजेंना कळताच त्यांनी तातडीने प्रवेशद्वाराकडे जाऊन डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची समजूत घातली. सर्व मागण्या संचालकांसह वरिष्ठ पातळीवर कळविण्यात येतील, असे आश्वासन दिले. यानंतर सर्व डॉक्टर व कर्मचारी पुन्हा कामावर परतले