केंद्र शासन राज्यांच्या मदतीबाबत दुजाभाव करीत असले तरी राज्य शासन स्वहिमतीवर शेतकऱ्यांना मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी इस्लामपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केला.

अद्ययावत उभारण्यात आलेल्या तहसील कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. प्रारंभी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

या वेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,की कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणार असून दोन लाखावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यात उद्योग विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळे बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील.

आपल्या सरकारमध्ये दमदार मंत्री असून हे शासन चांगल्या पद्धतीने काम करेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,की प्रत्येकाला न्याय देण्याचे काम शासन करेल. इतिहासातील लढाया लढण्यापेक्षा इतिहास घडविण्यासाठी लढले पाहिजे. केंद्र सरकार राज्याला व पूरग्रस्तांना निधी देताना दुजाभाव करीत असून आम्ही हा निधी आमच्यासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी मागत आहोत. तरीही कोणी हात आखडता धरत असेल तर आम्ही लाचार होणार नाही आणि यासाठी कुणाही पुढे झुकणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

आपल्या प्रास्ताविकमध्ये बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले,की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा क्रांतिकारक निर्णय सरकारने घेतला आहे. मागील सरकारकडून सामान्य जनतेच्या हिताची जपणूक होत नव्हती, म्हणून आमच्या सरकारला कौल मिळाला. ठाकरे सरकार जनहिताला प्राधान्य देऊन काम करणारे सरकार आहे. शब्दाला जागणारे नेते आहेत, कमी वेळेत प्रशासनावर पकड घेतली असून राज्यातील बेकारीच्या प्रश्नांवर मात करण्याचे कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, परिवहन व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार धर्यशील माने, आ. मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, माजी मंत्री अण्णा डांगे आदी उपस्थित होते.