नीलेश पवार, नंदुरबार

कोटय़वधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या ‘सेंट्रल किचन’द्वारे विद्यार्थ्यांना नियमांचे उल्लंघन करून अन्नपदार्थ दिले जात असल्याचे उघड झाले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या दुधाच्या पिशवीवर उत्पादन अथवा कोणत्या दिवसापर्यंत वापराची मुदत, या तारखांचा उल्लेख करण्यात आला नव्हता. पाचशे मि.लि.च्या या पिशवीत अवघे २०० मि.लि. दूध होते. या गंभीर प्रकाराबाबत प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.

शासनाने जिल्ह्य़ातील आश्रमशाळांसाठी शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून सेंट्रल किचनमधूनच जेवण देण्याची योजना सुरू केली. स्त्रीशक्ती यासंस्थेला देण्यात आलेल्या या सेंट्रल किचन पद्धतीचा प्रवेशाच्या दिवशीच फज्जा उडाला. परंतु पहिलाच दिवस असल्याने सुधारण्यास वाव असल्याचे ध्यानात घेऊन हे काम सुरू ठेवण्यात आले. जूनच्या पंधरवडय़ात अपुरे आणि कच्च्या स्वरूपाचे जेवण, जेवण वेळेवर न मिळणे अशा समस्या आढळून आल्या. त्यांच्याकडे विभागातील मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांनी सोयीस्कर कानाडोळा केला.

दोन ते तीन दिवसांपूर्वी या प्रकल्पांतर्गत जवळपास १० हजार विद्यार्थ्यांना निर्मल दुधाच्या पिशवीतील दुधाचा पुरवठा करण्यात आला. या पिशवीवर दूध उत्पादन आणि त्याच्या वापराच्या अंतिम मुदतीची (एक्स्पायरी डेट) तारीख छापलेली नसल्याचे उघड झाले. त्यामुळे पिशवीतील दूध हे वापराची मुदत संपल्यानंतर विद्यार्थ्यांना दिले गेले नसेल कशावरून, अशी शंका उपस्थित होत आहे. काही कोटींचे अंदाजपत्रक असलेल्या या सेंट्रल किचन प्रणालीची प्रयोगशाळा महिन्याभरात सुरू होऊ शकलेली नाही. या प्रयोगशाळेसाठीच विभागाकडून ५० लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. सेंट्रल किचनमध्ये तयार होणाऱ्या अन्नाचा दर्जा तपासला जातो काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ही संस्था चालविणाऱ्या ठेकेदारांचे लागेबांधे थेट मुंबईत असल्यानेच त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई करण्यास अधिकारी आणि कर्मचारी धजावत नसल्याचे चित्र आहे. याबाबत स्त्रीशक्ती संस्थेने पिशवीतून वितरित करण्यात आलेले दूध हे अमूल कंपनीचेच असल्याचा निर्वाळा दिला; परंतु दूध गोड आणि बोर्नव्हिटामिश्रित हवे असल्याने त्याची बांधणी त्या पद्धतीने करण्यात आली होती. संबंधित दूध वितरकाला प्रायोगिक तत्त्वावर काम दिल्यानेच पिशवीवर उत्पादन आणि अंमित मुदतीच्या तारखेचा उल्लेख करण्यात आला नसल्याची चूक झाल्याचे कबूल करत यापुढे अमूलच्या ‘टेट्रा पॅक’मधूनच दूध वितरित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना वितरित झालेले दूध हे शंभर टक्के उत्कृष्ट असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शैक्षणिक सत्राचे हे सुरुवातीचे दिवस असल्याने विद्यार्थी संख्येमुळे नियोजन कमी-अधिक प्रमाणात विस्कळीत झाले असले तरी आगामी काळात अधिक उत्तम सुविधा देण्याची ग्वाहीदेखील संस्थेकडून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या त्या पिशवीमधील दूध हे उत्तम दर्जाचेच होते. विद्यार्थ्यांना चवीचे दूध आवडत असल्याने प्रायोगिक तत्त्वावर आमच्याकडे पुरवठा करण्याची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यामुळे घाईत ५०० मिलीच्या पिशवीत २०० मिली दूध भरण्यात आले. काही पिशव्यांवरील उत्पादन तारीख आणि अंतिम मुदतीची तारीख छापण्यात काही त्रुटी राहिल्या. परंतु विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेले दूध शंभर टक्के सुरक्षित आणि दर्जेदार होते.

-निर्मल जैन दूध वितरक, सेंट्रल किचन