राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पूरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना अखेर राज्यशासनाकडून आर्थिक मदत देण्यास सुरूवात झाली आहे.

यानुसार आता नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी २ हजार २९७ कोटी ६ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचा आदेश आज(सोमवार) काढण्यात आला आहे. या संदर्भात आज निवडणूक आयोगाने पत्र पाठवून मदत वाटपाबद्दलच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून १० हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरीत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र अद्यापर्यंत शेतकऱ्यांना कुठलीही आर्थिक मदत मिळालेली नसल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात होती. शिवाय, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने शेतकऱ्यांना मदत देण्यात सरकारला देखील अडचणी येत होत्या.