14 August 2020

News Flash

निधी दिला तर लाभार्थी उत्तम आहार घेतात काय? हे पाहणे गरजेचे : यशोमती ठाकूर

बचत गटातील अतिगरीब महिलांना ७१ लाखांचे धनादेश वाटप

गावातील गरोदर माता, स्तनदा माता आणि लहान मुलांना योग्य आहार मिळाला, तर आपण कुपोषणावर नक्कीच मात करू शकतो. त्यामुळे या घटकाला अंगणवाडीतून उत्कृष्ट पोषण आहार देणे, हाच महिला व बालविकास विभागाचा मूळ उद्देश आहे. मात्र आहाराऐवजी निधी दिला तर खरंच त्या पैशातून संबंधित लाभार्थी तसा आहार घेतात का? हे पाहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज मंगळवारी यवतमाळ येथे केले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिला व बालविकास विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. टाळेबंदीच्या काळात विभागातर्फे घरपोच पोषण आहार देण्यात आला, असे सांगून ठाकूर म्हणाल्या, पोषण आहाराच्या वितरणामध्ये कोणतीही कमतरता राहू देऊ नका. महिला व बालकल्याण विभागासाठी दरवर्षी नियोजन समितीमधून एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी अंगणवाडी सुधार व बांधकामाकरीता वापरता येईल.

यवतमाळ जिल्ह्यात कुमारी मातांचे प्रमाण जास्त आहे. २०१२ मध्ये कुमारी मातांच्या पुनर्वसनासाठी जागा देण्यात आली होती. त्याचे पुढे काय झाले? सदर प्रस्ताव कुठे थांबला आहे? याबाबत ठाकूर यांनी सविस्तर माहिती घेतली. या प्रकल्पांतर्गत पाच एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती. या जागेवर आधारगृहाचे बांधकाम करणे अपेक्षित आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. येथे आधारगृह होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करू. एक स्त्री सर्व कुटुंबाला शिकविते. त्यामुळे शाळा सोडलेल्या मुलींचे प्रशिक्षण महत्वाचे आहे. कोणतेही मूल अनाथ राहू नये, यासाठी मुलांचे संरक्षण, निवारा गृहे याबाबत नियोजन करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

उद्योजकांचा सीएसआर फंड महिला व बालविकास विभागाच्या कामासाठी वापरावा. यातून अंगणवाडी डिजीटल करणे, अर्धवट अंगणवाडी बांधकाम पूर्ण करणे, महिला व बालकल्याण भवन निर्माण करणे आदी कामे अधिका-यांनी करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी माविमच्या बचत गटातर्फे लावण्यात आलेल्या प्रदर्शनीची पाहणी केली. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे बचत गटातील अतिगरीब महिलांना ७१ लाखांच्या धनादेशाचे वाटप यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यात आर्णी तालुक्यातील तेजस्विनी लोकसंचालीत साधन केंद्राला १५ लाख १६ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच, पुसद येथील लोकसंचालीत साधन केंद्र १२ लाख ७३ हजार, उमरखेड येथील लोकसंचालीत साधन केंद्र नऊ लाख १४ हजार, मारेगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचालीत केंद्र १२ लाख ४४ हजार रुपये, पांढरकवडा येथील लोकसंचालीत साधन केंद्र १२ लाख ३७ हजार आणि कळंब येथील प्रगती लोकसंचालीत साधन केंद्राला नऊ लाख १४ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या ग्रामीण, नागरी व राज्य पातळीवरील कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला महिला व बालविकास विभागाचे अधिकारी तसेच तालुक्यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 8:59 pm

Web Title: distribution of checks worth rs 71 lakhs to extremely poor women in self help groups msr 87
Next Stories
1 युजीसीच्या सूचना बंधनकारक नव्हेत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचं मत
2 रायगड जिल्ह्यात २४ तासात २३५ नवे करोनाबाधित, पाच जणांचा मृत्यू
3 चंद्रपूर : राज्य राखीव दलाचे तीन जवान करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X