जिल्ह्यातील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका आणि इतर बँकांच्या माध्यमातून यंदाच्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत एक लाख, ४१ हजार, ४४ शेतकऱ्यांना ५६९ कोटी, १३ लाख, ४३ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांनी दिली आहे.

जिल्ह्यास २०२०-२१ वर्षांसाठी खरीप कर्ज वाटपाचा २८९२ कोटी, ६८ लाख, २३ हजार रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. रब्बीसाठी ४४७ कोटी, २२ लाख, ३६ रुपयांचा लक्षांक याप्रमाणे खरीप आणि रब्बी हंगामासाठी एकूण ३३३९ कोटी, ९० लाख, ५९ हजार रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत खरीप हंगामासाठी ५६९ कोटी, १३ लाख, ४३ हजार रुपयांचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. या पीक कर्ज वाटपात सर्वाधिक वाटा हा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आहे. या बँकेने एक लाख, ३५ हजार ४३ शेतकऱ्यांना ४४२ कोटी, १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांनी चार हजार ३३५ शेतकऱ्यांना ६९ कोटी, एक लाख ७७ हजार रुपये, ग्रामीण बँकांमार्फत १६१ शेतकऱ्यांना एक कोटी, ८० लाख, ३९ हजार रुपये, खासगी बँॅकांमार्फत एक हजार, ५०५ शेतकऱ्यांना ५६ कोटी, १५ लाख, २७ हजार रुपये याप्रमाणे सर्व बँका मिळून जून २०२० अखेर ५६९ कोटी, १३ लाख, ४३ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जूनअखेर अपलोड केलेली कर्ज खाती एक लाख, ७४ हजार, १०७ आहेत. आधार प्रमाणीकरण झालेली एकूण खाती एक लाख, ५० हजार ६७३ एवढी आहेत. तर आधार प्रमाणीकरण शिल्लक असलेली खाती नऊ हजार, १६४ एवढी आहेत. तक्रार असलेली एकूण खाती सात हजार २०० आहेत. जिल्हा तक्रार निवारण समितीद्वारे तक्रार निवारण झालेल्या खात्यांची संख्या एक हजार २४६ असून तहसीलदारांद्वारे तक्रार निवारण झालेली खाती दोन हजार ६६८, तहसीलदारांकडे तक्रार निवारणासाठी प्रलंबित खाती एक हजार ३६ एवढी आहेत. जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत आतापर्यंत एकूण एक लाख, २७ हजार, ६८३ लाभार्थ्यांंना ७२९ कोटी, ८७ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती राठोड यांनी दिली आहे.