राहाता : माणसाची जगण्याची लढाई सगळ्या पातळीवर अवघड बनली असली तरी भाषा व साहित्याच्या माध्यमातून जिवंतपणाचा अर्थ  समजावून सांगण्याची जबाबदारी साहित्यिकांना पार पाडावी लागेल,त्यामुळेच त्यांच्याकडे समाज आश्वासक नजरेने बघत आहे,  असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य  संमेलनाच्या अध्यक्ष डॉ.अरूणा ढेरे यांनी केले.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११९ व्या जयंती दिनानिमित्त  प्रवरा परिवारातर्फे देण्यात  येणाऱ्या राज्य आणि जिल्हास्तरीय साहित्य  व कलागौरव पुरस्कारांचे वितरण बुधवारी डॉ.अरूणा ढेरे यांच्या हस्ते प्रवरानगर येथे करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे, खा.डॉ.सुजय विखे, डॉ.राजेंद्र विखे, माजी आ.चंद्रशेखर कदम,कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे उपस्थित होते.

यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक,समीक्षक, विचारवंत माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना  साहित्य जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  १ लाख रुपये रोख व  स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार किरण गुरव (कोल्हापूर) यांच्या जुगाड या कादंबरीस ,  विशेष साहित्य पुरस्कार प्रा. गो.तु.पाटील (येवला) यांच्या ओल अंतरीची या आत्मचरित्रास , तर  जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार नीलिमा क्षत्रिय (संगमनेर) यांच्या आलापल्लीचे दिवस या ललित ग्रंथास  व  जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार शैलेश त्रिभुवन (कोपरगाव) यांच्या अस्वस्थ मनातील शब्द या काव्यसंग्रहास देऊन गौरविण्यात आले. यावर्षीचा नाटय़सेवा पुरस्कार जालना येथील राजकुमार तांगडे , समाजप्रबोधन पुरस्कार नाशिकचे धनंजय गोवर्धने यांना, कलागौरव पुरस्कार पुणे येथील शमसुद्दीन तांबोळी यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ.अरुणा ढेरे म्हणाल्या की,मराठी साहित्यात या पुरस्काराने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. विचारधारा उजवी की डावी, चळवळ कुठली याला महत्त्व न देता साहित्यात या पुरस्काराने मानाचे स्थान प्राप्त केले. साहित्यिकांच्या सन्मानाचे  काम  चंगळवादी आणि बाजारीकरणाच्या वातावरणातही या परिसरात होत आहे.  लिहिणारे तरुण लेखक या माध्यमातून समाजासमोर येत आहेत. नवीन लेखक स्वत:च्या जगण्याशी प्रामाणिक राहून लेखन करीत आहेत अशा लेखकांकडेच समाज मोठय़ा आशेने पाहात आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी  सांगितले की, सामान्य माणसाच्या जाणिवा लक्षात घेऊनच कोणत्याही क्षेत्रातील माणसाचे मार्गक्रमण झाले पाहिजे. खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी साधेपणा आणि ग्रामीण शैली कधी सोडली नाही, ग्रामीण भागाशी नाळ तुटू दिली नाही. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे पुढारी वागले तरच समाज बरोबर राहील. तुमचा पतंग कितीही आकाशात उंच गेला तरी त्याची दोरी ही जनतेच्याच हातात आहे हे विसरु नका .

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी  सांगितले की,  साहित्यिक आणि कलाकारांनी आपल्या साहित्य कृतीतून समाजाची दु:खे आणि वेदना समोर आणण्याचे काम केले. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्याचे भाग्य मिळते याचे समाधान आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून कोल्हापूर,सांगली, सातारा या भागात नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांना १ कोटी रुपयांची  मदत करणार आहे.

डॉ.नागनाथ कोतापल्ले म्हणाले की, माणसाला जगण्यासाठी सांस्कृतिक भूक असते, या पुरस्कारांमुळे सांस्कृतिक संवर्धन होत असून, मानवी जीवनाचा स्तरही उंचावलेला दिसत आहे. ज्या देशाचा सांस्कृतिक स्तर हा खालच्या पातळीवर असतो तेथे कधीही सौख्य नांदत नाही. याप्रसंगी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खासदार डॉ. खासदार सुजय विखे  यांनी प्रास्ताविक  केले.