कोरची तालुक्यातील घटना; पोलिस, जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी ढिम्म

गावकऱ्यांच्या सहकार्याने नक्षल्यांनी मारहाण करून गावातून हाकललेल्या कोरची तालुक्यातील अलोंडी येथील वालदे व टेंभूर्णे कुटुंबीयांना निवाऱ्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या नक्षलपीडित कुटुंबीयांनी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मुक्काम ठोकला असून दहशतीच्या सावटात मुलाबाळांसह अंगावरील कपडय़ावर दिवस काढत आहेत. जिल्हा व पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मदतीऐवजी हा प्रकार उघडय़ा डोळ्यांनी बघत आहेत.

thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना
Shramjivi organization
ठाणे : पाणी प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायतींवर मोर्चे, रिकामे हंडे घेऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब
Jalgaon district
जळगाव जिल्ह्यातील नाकाबंदीत मद्यसाठ्यासह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
Major office bearers of Congress in Buldhana Lok Sabha constituency tendered their collective resignations
बुलढाणा: काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे… ‘हे’ आहे कारण…

अवघ्या ४७ घरांच्या अलोंडी गावात दलितांची ७, गोवारी समाजाची ३, तर उर्वरित घरे आदिवासींची आहेत. हे गाव पूर्णत: नक्षलग्रस्त असून, गावात दिवसाढवळ्या नक्षलवादी येत असतात. गावकऱ्यांच्या मदतीने नक्षल्यांनी आपल्या कुटुंबांना कसे बेघर केले, याची आपबिती हरिराम वालदे व टेंभूर्णे कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत सांगितली. यावेळी हरिराम वालदे, गौतम हरिराम वालदे, शालिक हरिराम वालदे, ललिता हरिराम वालदे, सोनू रवींद्र वालदे, बायजाबाई वैद्यनाथ टेंभूर्णे, सायजाबाई उत्तम टेंभूर्णे, शुभांगी उत्तम टेंभूर्णे व शुभंम उत्तम टेंभूर्णे आदि उपस्थित होते. यावेळी ललिता वालदे म्हणाली की, २२ जूनला वडील व भाऊ बाहेरगावी गेले होते. माझी पुतणी सोनू वादले आजीसह आम्ही घरी होतो. रात्री साडेबारा-एक वाजताच्या सुमारास गावातीलच बुधराम सहारे, लखन कुंजाम, सुनील वालदे, शकुंतला कऱ्हांडे, पंकज नक्षल्यांसारखा पोशाख घालून हातात बंदुका व काठय़ांसह घरात शिरले. बाहेरही २० ते २५ सशस्त्र नक्षलवादी होते. सर्वानी आम्हाला धमकावून मोबाईल व अन्य साहित्य नेले. त्यानंतर मारहाण करून टेंभूर्णे यांच्या घराकडे नेले. त्यानंतर बायजाबाई टेंभूर्णे व त्यांची दोन लहान मुले, असे आम्हा तिघींना दीड किलोमीटरवरील मिसपिरी गावाजवळच्या जंगलात नेले. त्यानंतर नक्षलवादी तेथून निघून गेले. अंधारात मी आजीचा हात सोडून सोनूसह पळ काढला आणि १८ किलोमीटरवरील मोहला गाव गाठले. तेथे एका नातेवाईकाच्या घरी थांबून वडील व भावाला बोलावले. त्यानंतर आम्ही कोटगूल पोलिस ठाण्यात तक्रार दिली

दुसऱ्या दिवशी पोलिसांसह गावात पोहोचल्यावर घरातील १०० पोती धान, तांदूळ, साडेचार लाख रुपये, दागिने, मोबाईल लंपास झाल्याने आढहून आले. शैक्षणिक व अन्य कागदपत्रेही पूर्णपणे फाडण्यात आली होती. टेंभूर्णे यांच्याही घरची स्थिती अशीच होती. यावेळी पोलिसांनी बुधराम सहारे, लखन कुंजाम, सुनील वालदे यांना अटक केली. मात्र, महिलांना अटक करता येत नाही, असे म्हणून कारवाई केली नाही. नंतर आम्ही कोरची पोलिस ठाण्यात गेलो. तेव्हापासून आम्ही बेघरच असून निवाऱ्यासाठी भटकत आहोत. प्रशासनाने आम्हाला नक्षलपीडित म्हणून निवाऱ्याची सुविधा व घटनेची चौकशी करून नक्षल्यांना सहकार्य करणाऱ्या गावक ऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वालदे व टेंभूर्णे कुटुंबीयांनी केली आहे. सध्या दोन्ही कुटुंबातील लोक गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात वास्तव्याला असून अंगावरील वस्त्रानिशी दिवस काढत आहेत. पैसे नसल्याने कुणी दिले तेच अन्न खाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. एवढी मोठी घटना होऊनही प्रशासनाने या कुटुंबाची साधी दखल घेतली नाही. हा सर्व प्रकार जिल्हा व पोलिस प्रशासन उघडय़ा डोळ्यांनी बघत आहे, तर स्थानिक लोकप्रतिनिधी व पालकमंत्री अंबरीश आत्राम यांना या घटनेशी काही देणे-घेणे नाही, अशा थाटात ते वावरत आहेत. गडचिरोलीतील ढिम्म प्रशासन व लोकप्रतिनिधींमुळे स्थानिक आदिवासी चांगलेच वैतागले आहेत. या सर्व पीडितांनी आता मुख्यमंत्री व पंतप्रधानांकडेच तगादा लावला असून नक्षलपीडितांची व्यवस्था करा, अशी मागणी लावून धरली आहे.