हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना तिथे जाण्याची परवानगी दिल्याबद्दल जिल्हा प्रशासनाने आता आक्षेप घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये नातेवाईकांना करोना वॉर्डमध्ये जाण्यास परवानगी देण्यात येत आहे. त्याऐवजी रुग्णालयाने रुग्णांची काळजी घेण्यासाठी अधिक वॉर्ड बॉय्ज आणि मावश्यांची नेमणूक करावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलं आहे.

नातेवाईकांच्या उपस्थितीमुळे रुग्णांना आधार मिळतो. मात्र त्यामुळे नातेवाईकांना संसर्गाचा धोका वाढतो आणि त्यांच्यामुळे आजाराच्या प्रसाराचीही शक्यता वाढते. ती व्यक्ती करोनाचा सुपरस्प्रेडर ठरू शकते अशी भीती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार देशमुख यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.

रुग्णांच्या नातेवाईकांची करोना वॉर्डमध्ये ये जा असणं ही योग्य गोष्ट नाही असंही देशमुख यांनी सांगितलं. जिल्हा प्रशासनाने वायसीएम रुग्णालयाला आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला रुग्णांची काळजी घेण्यासाठी अधिक वॉर्ड बॉय्ज आणि मावश्यांची नेमणूक कऱण्याचा सल्ला दिला आहे.

या रुग्णालयाचे मुख्याधिकारी डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितलं की, परिवारातल्या सदस्यांना गंभीर रुग्णांच्या जवळ जाऊ देण्याचं कारण म्हणजे कर्मचाऱ्यांची कमतरता. तसंच काही वयोवृद्ध रुग्णांना आधारासाठी गरज लागत असल्याने त्यांच्या नातेवाईकांना वॉर्डमध्ये जाण्यास परवानगी दिली जाते.

हेही वाचा- करोना रुग्णांना आपलेपणा देणारे उपचारकेंद्र

गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर्सची सोय अपुरी पडत असल्याने आम्ही काही रुग्णांना वॉर्ड्समध्ये ठेवलेलं आहे. ज्यावेळी या रुग्णांना शौचालयात जायचं असतं, त्यावेळी काही रुग्णांना स्वतः जाता येत नाही. त्यांना कोणीतरी सोबत असण्याची, आधाराची गरज लागते. आम्ही प्रत्येक रुग्णाला ही सोय पुरवू शकत नाही आणि त्यामुळे रुग्णाला गरज असेल तेव्हा आम्ही त्या रुग्णाच्या नातेवाईकांना वॉर्डमध्ये जाण्याची परवानगी दिली आहे, असंही ते म्हणाले.

डॉ. वाबळे म्हणाले की, परिवारातल्या सदस्यांनी रुग्णालयाच्या आवारातच राहणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी रुग्णाला गरज असेल त्यावेळी त्यांना बोलवण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने आक्षेप नोंदवल्यानंतर डॉ. वाबळे म्हणाले की, आम्हाला आता सहाय्यकांची अधिक गरज लागणार आहे. सध्या रुग्णालयात २७८ सहाय्यक कर्मचारी आहेत. मात्र, त्यांच्या परिवारातल्या सदस्यांना करोनाची लागण झाल्याने त्यातले काही जण सध्या सुट्टीवर आहेत. आम्हाला आता खासगी संस्थांना सांगून नवी भरती करावी लागेल अथवा त्यासाठी जाहिराती द्याव्या लागतील.

अॅड. मनिषा जाधव यांचे वृद्ध नातेवाईक सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्या म्हणाल्या, आमच्या रुग्णाचं वय जास्त असल्याने परिवारातला एक तरुण व्यक्ती त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत असायचा. मात्र, त्यालाही करोनाची लागण झाली. त्यामुळेच माझा या प्रकाराला विरोध आहे. अशामुळे परिवाराच्या इतर लोकांनाही लागण होण्याचा धोका आहे त्याचसोबत संसर्गाचं प्रमाण वाढण्याचीही शक्यता आहे. या रुग्णालयाने गंभीर रुग्णांच्या देखरेखीसाठी काहीतरी सोय करणं गरजेचं आहे.