परभणी व िहगोली जिल्ह्यांतील सेवा सहकारी आणि धान्य अधिकोष सहकारी संस्थेच्या मतदारसंघातील उमेदवारांनी दाखल केलेल्या आक्षेप याचिकांच्या पाश्र्वभूमीवर सर्वाचे लक्ष उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रत्येकच सहकारी संस्था मतदारसंघात निर्माण झालेली गुंतागुंतीची स्थिती निवळण्याची चिन्हे असून, बहुतांश मातब्बर उमेदवार िरगणात राहणारच आहेत. दरम्यान, काही आक्षेप याचिकांची गुरुवारी, तर काहींची उद्या (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच कमालीची किचकट झाली आहे. त्यातच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांसाठी ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
परभणी जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया ४ एप्रिलपासून सुरू झाली. दि. ८ एप्रिलपर्यंत एकूण ११० उमेदवारांचे अर्ज आले. ९ एप्रिलच्या छाननीत ७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. छाननीत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर दाखल झालेले आक्षेप विचारात न घेता निर्वाचन अधिकारी एस. एच. मावची यांनी इतर उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले. या निर्णयाविरोधात पूर्णा मतदारसंघातून बालाजी देसाई यांनी रमेशराव दुधाटे व मारोतराव पिसाळ यांच्या उमेदवारीवर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने देसाई यांची याचिका फेटाळल्यामुळे दुधाटे व पिसाळ या दोघांचेही नामनिर्देशनपत्र कायम राहिले.
गंगाखेड सोसायटी मतदारसंघातून भगवान सानप यांनी सीताराम कदम यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. तीही न्यायालयाने फेटाळली. पालममध्ये नारायण िशदे यांची भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांच्याविरोधातील याचिका फेटाळण्यात आली. सेलू मतदारसंघात जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र लहाने यांची पत्नी वर्षां लहाने यांच्या उमेदवारीवर घेतलेला आक्षेपही खंडपीठाने फेटाळला. पाथरीमधूनही प्रभाकर िशदे यांची याचिका नामंजूर झाल्यामुळे आमदार बाबाजानी यांची उमेदवारी कायम राहिली. िहगोली मतदारसंघातून आमदार तानाजी मुटकुळे व माजी आमदार गजानन घुगे या दोघांनीही परस्परांविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. या दोन्ही याचिका फेटाळल्याने आता त्या ठिकाणी दोघांमध्ये सामना होणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रमेशराव दुधाटे, मारोतराव पिसाळ, आ. बाबाजानी दुर्राणी, लक्ष्मणराव गोळेगावकर, सीताराम कदम, पंडित चोखट, वर्षां लहाने यांना दिलासा मिळाला आहे. सोनपेठ मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या उमेदवारीवर रेणुका राठोड यांनी आक्षेप घेत दाखल केलेली याचिकेची सुनावणी प्रलंबित असून उद्या या संबंधी निकाल येण्याची शक्यता आहे.
आजपर्यंत पूर्णेतून माधव साहेबराव कदम व बिगरशेती व शेतीपूरक सहकारी मतदारसंघातून समशेर वरपुडकर या दोघांनीच आजपर्यंत माघार घेतली. सेनगावमधून माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज माघारीसाठी उमेदवारांची एकच गर्दी होणार आहे. गुरुवारी रात्री प्रतिस्पर्धी उमेदवारांनी उमेदवारी मागे घ्यावी, या साठी जोरदार घडामोडी चालू होत्या. अर्ज परत घेतल्यानंतरच पॅनेलबाबतही अंतिम निर्णय होईल.