जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येत्या निवडणुकीतील मतदारांची अंतिम यादी बुधवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली. या हालचालींना आता वेग येणार असून, येत्या दहा ते पंधरा दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल.
जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी ही माहिती दिली. मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याने बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा संचालकांच्या चार जागा कमी झाल्या असून २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघात १ हजार ३०२, शेतीपूरक मतदारसंघात १ हजार ६७ आणि बिगरशेती मतदारसंघात १ हजार ३६५ याप्रमाणे मतदारसंख्या आहे. प्रारूप यादीवर तब्बल १३५ हरकती दाखल झाल्या होत्या. नाशिक येथे सहनिबंधक कार्यालयात त्यावर सुनावणी झाल्यानंतर आज बँकेच्या निवडणुकीतील अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली.  विविध कारणांनी दोनदा मुदतवाढ मिळाल्याने तब्बल सात वर्षांनी बँकेची निवडणूक होत आहे.
गेल्या निवडणुकीत बँकेत राष्ट्रवादी व काँग्रेसमधील थोरात गटाची युती झाली होती. या गटाने २५ पैकी २१ जागाजिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. काँग्रेसमधील विखे गटाला त्या वेळी अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. सध्या प्रशासकीय पातळीवर बँकेच्या निवडणुकीची प्राथमिक तयारी सुरू असली तरी राजकीय वर्तुळात मात्र अजूनही तुलनेने शांतताच आहे. जिल्हय़ातील अनेक साखर कारखान्यांच्याही निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, त्या आटोपल्यानंतर जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकीय मोर्चेबांधणीला वेग येईल, असे दिसते. दरम्यान, काँग्रेसअंतर्गत विखे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्यादृष्टीने विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचेही समजते.
अंतिम यादीतही सुधारणा
बँकेची अंतिम मतदारयादी आज प्रसिद्ध झाली असली तरी ती उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होण्याच्या दिवसापर्यंत सुधारित करण्यात येणार आहे. जिल्हय़ातील अनेक विविध कार्यकारी सेवा संस्थांच्याही निवडणुका सध्या सुरू आहेत. या संस्थांनी मतदारयादीसाठी त्यांच्या प्रतिनिधींच्या नावांचे ठराव पूर्वीच पाठवले असले तरी निवडणुकीनंतर हा ठराव बदलायचा झाल्यास जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत अशा संस्थांना ठराव बदलता येतील. त्यामुळे या अंतिम मतदारयादीतही काही बदल होण्याची शक्यता आहे.