News Flash

रायगडमधील धोकादायक पुलांच्या सर्वेक्षणाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

चार वर्षांपूर्वी झालेल्या सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी रायगड जिल्ह्यातील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

पावसाळ्यापूर्वी रायगड जिल्ह्यातील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण करावे. त्या पुलांची तातडीने दुरुस्ती करावी. ज्या पुलांची दुरूस्ती शक्य नाही, त्या पुलांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी, असे निर्देश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संबंधीत विभागाला दिले आहे. सावित्री नदी पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पुलांच्या दुरुस्तीचे निर्देश दिले.

२ ऑगस्टला २०१६ ला महाड परीसरात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सावित्री नदीवरील ब्रिटीशकालिन पूल वाहून गेला होता. त्यामुळे अंधारात पूल वाहून गेल्याचे लक्षात न आल्याने त्यावरुन जाणाऱाय दोन एस.टी. बस आणि एक तवेरा गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. यामध्ये ४२ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर ब्रिटीशकालिन आणि जुन्या पूलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न प्रामुख्याने समोर आला होता. सावित्री पूल दुर्घटनेची दखल घेऊन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याच ठिकाणी सहा महिन्यात नवीन पूल बांधण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या नदीवर नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र, महामार्गावरील इतर जुन्या आणि ब्रिटीशकालीन पुलांचा प्रश्न अजूनही कायम आहे.

महामार्गावर पनवेल ते महाड उपविभागात १३ लहान ब्रिटीशकालिन पूल आहेत. तर काळ आणि गांधारी नदीवर मोठे ब्रिटीशकालिन पूल आहेत. ९१ मीटर लांबीच्या मेसनरी आर्च पध्दतीच्या काळ नदीवरील पुलाची निर्मिती १८७१ मध्ये करण्यात आली आहे. तर ६३ मीटर लांबीच्या मेसनरी आर्च पध्दतीच्या गांधारी नदीवरील पुलाची निर्मीती १९४५ साली करण्यात आली आहे. या पुलांवरून आजही अवजड वाहतूक सुरुच आहे. कोलाडजवळ कुंडलिका नदीवर, तर पाली जवळ आंबा नदीवर जुने पूल अस्तित्वात आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्या अखत्यारीत एकूण २६ मोठे पूल आहेत. यातील आंबेत म्हाप्रळ मार्गावरील आंबेत पूल, महाड करंजाडी रस्त्यावरील दादली पूल, वीर टोळ मार्गावरील टोळ पूल कमकुवत झाले आहेत. त्यामुळे या पुलांवरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांच्या कार्यक्षेत्रात राज्य मार्गावरील १३९ पूल आणि जिल्हा मार्गावंरील ७९ पुलांचा समावेश आहे. यातील रेवदंडा साळाव खाडीवरील पूल आणि सहानपाल्हे पूल धोकादायक बनले आहेत. त्यामुळे या पुलांवरील अवजड वाहतुक बंद करण्यात आली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणारे १४ पूल धोकादायक आहेत. त्या पुलांची तांत्रिक तपासणी करण्याबाबतचा अहवाल कोकण भवन येथील अधिक्षक अभियंता यांना सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या अंबानदीवरील पाली पुलावरूनही अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. या सर्व पुलांचे तातडीने सर्वेक्षण करून, त्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जावी, आवश्यक ठिकाणी पर्यायी मार्गांचे नियोजन करण्यात यावे असे, निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 2:01 pm

Web Title: district collector orders survey of dangerous bridges in raigad aau 85
Next Stories
1 करोना संपल्यावर काँग्रेसमध्ये भूकंप होणार; चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट
2 Coronavirus : औरंगाबादमध्ये आणखी दोन मृत्यू, 24 नवे पॉझिटिव्ह
3 RSS च्या अजेंड्यात नाथाभाऊ न बसल्याने तिकिट नाकारलं – चंद्रकांत पाटील
Just Now!
X