21 January 2018

News Flash

सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण?

शरद पवार, फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला

प्रतिनिधी, सोलापूर  | Updated: March 21, 2017 12:39 AM

शरद पवार, फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला आणखी काही तासांचा अवधी शिल्लक असताना सत्ता राखण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वत: लक्ष घातले आहे. तर दुसरीकडे सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप पुरस्कृत महाआघाडीच्या बाजूने स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष रस दाखविला आहे. सत्तेसाठी घोडेबाजार सुरू असतानाच माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व अक्कलकोटचे कांग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे या दोघांची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचा अध्यक्षपदाचा उमेदवार अद्यापि निश्चित झाला नाही. उद्या प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित केला जाणार आहे. पक्षाच्या बैठकीत स्वत: शरद पवार हे भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून अध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करतील, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप पुरस्कृत महाआघाडीतर्फे माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे धाकटे बंधू संजय शिंदे यांची उमेदवारी यापूर्वीच घोषित झाली आहे. ६८ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत सर्वात जास्त राष्ट्रवादीचे २६ सदस्य आहेत. सत्तेचा सोपान गाठण्यासाठी ३४ सदस्यांचे बळ ज्यांच्याकडे असेल, त्यांचा अध्यक्ष निवडून येणार आहे. राष्ट्रवादीने सत्ता राखण्यासाठी कांग्रेस (७ सदस्य), शेकाप (३ सदस्य) यांचे समर्थन घेतले आहे. दोन्ही काँग्रेस व शेकापची झालेली ही आघाडी वरवर पाहता बहुमत सिध्द करणारी असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात दोन्ही काँग्रेसमध्ये फोडाफोडी करून सत्ता संपादन करण्याचा भाजप पुरस्कृत महाआघाडीचा मनसुबा आहे. विशेषत: राष्ट्रवादीतील गटबाजीचा विचार करता मतांची फाटाफूट टाळून सत्ता राखण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोलापूरकडे लक्ष देणे भाग पडले आहे.

माढा तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा भाजप पुरस्कृत महाआघाडीचे संजय शिंदे हे दोघे मिळूनच राजकारण करतात. अगदी नुकत्याच झालेल्या तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदाची निवड करताना दोघा शिंदे बंधूंनीच एकत्र बसून सर्व पंचायत समिती सदस्यांचा कानोसा घेतला होता.

आता राष्ट्रवादीच्या विरोधात अध्यक्षपदाचे उमेदवार बंधू संजय शिंदे हेच असल्याने आमदार बबनराव शिंदे यांच्यासमोर धर्मसंकट उभे राहिले आहे. त्यांच्या माढा तालुक्यात राष्ट्रवादीचे पाच सदस्य आहेत. शिवाय त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे अपक्ष सदस्य आहेत. म्हणजे सहा सदस्य आमदार शिंदे यांना मानणारे आहेत. या सर्व सदस्यांनी संजय शिंदे यांना मदत करण्याची भूमिका घेतल्याचे समजते. यात बंडखोरी होऊन पक्षांतरबंदीचा बडगा उगारला गेला तरी पुन्हा पोटनिवडणुकीत आपली ताकद सिध्द करण्याची मानसिकता शिंदे गटाची झाल्याचेही सांगितले जाते. संजय शिंदे हे स्वत: आपले बंधू आमदार बबनराव शिंदे यांच्या पाठिंब्याने आपण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार असल्याचा दावा करतात. त्यावर आमदार शिंदे हे कोणतेही स्पष्टीकरण न देता मौन बाळगून आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सवराचे लक्ष वेधले आहे.

आमदार शिंदे यांच्याप्रमाणेच अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांचीही भूमिका जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेसचे सात सदस्य असून त्यापैकी पाच सदस्य आमदार म्हेत्रे यांना मानणारे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांना फोडण्यात भाजप पुरस्कृत महाआघाडी यशस्वी झाल्याचे सांगितले जात असले तरी शेवटच्या क्षणी काय घडेल, याचा अंदाज बांधणे कठीण झाल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

First Published on March 21, 2017 12:39 am

Web Title: district council president election sharad pawar devendra fadnavis
  1. S
    sanket kapre
    Mar 21, 2017 at 3:59 am
    होऊन जाऊ दे फोडाफोडी .
    Reply