महाड तालुक्यातील चिंभावे गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत गुरुवारी सकाळी अचानक कोसळली. उन्हाळी सुटय़ांमुळे शाळा बंद असल्यामुळे या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. या दुर्घटनेत शाळेची पूर्ण इमारतच उद्ध्वस्त झाल्याने येत्या काही दिवसांत सुरू होणारी शाळा कुठे भरवायची हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. सुमारे शंभर वर्षांहून अधिक जुनी असलेल्या या शाळेची इमारत मोडकळीस आली होती. या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला होता. मात्र अद्यापही त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याची माहिती महाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. गुरुवारी सकाळी ६.३० वा.च्या सुमारास आठ वर्गखोल्यांच्या या इमारतीची भिंत अचानक कोसळून इमारतीचे छप्पर व अन्य भाग उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला मिळाले. या शाळेच्या तीन वर्गखोल्या या चिंभावे हायस्कूलसाठी देण्यात आल्या आहेत. दोन शिक्षक आणि ४५ विद्यार्थी पटसंख्या असलेल्या या शाळेचे वर्ग कुठे भरवायचे हा प्रश्न ग्रामस्थ पालकांसह शिक्षण विभागाला पडला आहे. जूनपासून गावातील मंदिरामध्ये शाळा भरवण्याबाबत प्रशासनाचा विचार असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत वार्षिक कार्य योजनेतून तालुक्यातील ३२ प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सन २०१२ मध्येच मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आले असून अद्यापही निधीअभावी या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नसल्याची माहिती सर्वशिक्षा अभियान विभागाचे कनिष्ट अभियंता सचिन पवार यांनी दिली. सभापती दिप्ती पावसकर, प्रीती कातगुडे, गटविकास अधिकारी मंडलिक, वरिष्ठ शिक्षण अधिकारी सुनीता पालकर आदींनी चिंभावे येथे भेट देऊन कोसळलेल्या इमारतीची पाहणी केली.