नगर : सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा रुग्णालयातील महिला कनिष्ठ लिपिक शिल्पा राजेंद्र रेलकर (४१) हिला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज, शुक्रवारी अटक केली. रेलकर हिला रुग्णालयातीलच प्रशासकीय कार्यालयात लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तिच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा रुग्णालयातच नोकरीला असलेल्या एका महिला तांत्रिक कर्मचारीचा परिविक्षाधीन कालावधी संपला, नंतर तिला सेवेत कायम करण्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवणे आवश्यक होते, परंतु त्यासाठी प्रशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिका शिल्पा रेलकर हिने ८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी सापळा रचला, पंचामार्फत शिल्पा रेलकर ही लाच मागत असल्याची खात्री केली, त्यानंतर सापळा रचला व रेलकर हिला पकडले.

पोलीस निरीक्षक शाम पवरे, दीपक करांडे, तन्वीर शेख, हरुण शेख, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गांगुल, रवींद्र निमसे, रादा खेमनर यांच्या पथकाने सापळा यशस्वी केला.