07 July 2020

News Flash

चिपळूण नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांविरूध्द अविश्वास ठराव?

या सर्व प्रकारांबद्दल नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन लेखणी बंद आंदोलन केले.

चिपळूण नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पाटील यांच्याविरूध्द सर्वपक्षीय असंतोष धुमसत असून त्यांच्या पिरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते.  नगर परिषदेची विशेष सभा गेल्या मंगळवारी झाली. त्यावेळी विरोधकांसह सत्ताधारी आघाडीच्या काही सदस्यांनी पाटील यांच्या कार्यपध्दतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी हातातील कागदपत्रे भिरकावणे, सभागृहात उपस्थित  कर्मचाऱ्यांच्या नोंदवह्या, कार्यक्रमपत्रिका हिसकावून फाडण्याचे प्रयत्न करणे, मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावरील पुस्तके आपटून त्यांना घेराव घालणे यासारखे अभूतपूर्व प्रकार घडले. काहीजणांनी तर त्यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचेच आरोप केले. विकासकामांची बिले अदा करताना त्यांच्याकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते, असा या नगरसेवकांचा आरोप आहे.नगर परिषदेत त्यांची वारंवार गैरहजेरी, हाही वादाचा महत्वाचा  मुद्दा आहे. त्यापैकी एका सदस्याने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या विषयांना जाहीर तोंड फोडले होते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांविरूध्द वातावरण तापत होते. गेल्या मंगळवारी झालेल्या बैठकीत त्याचा भडका उडाला. पण सदस्यांच्या या वर्तनामुळे उद्विग्न झालेले मुख्याधिकारी पाटील आणि अन्य कर्मचारी सभागृहातून बाहेर पडले. माजी नगराध्यक्ष सुचय रेडीज आणि गटनेते राजेश कदम यांनी त्यांची समजूत काढून पुन्हा सभागृहात आणले. पण विरोधी सदस्यांनी थोडय़ाच वेळात पुन्हा आरोप, घोषणाबाजी आणि आरडाओरडा सुरू केल्याने मुख्याधिकारी पाटील यांनी पुन्हा सभागृहाचा त्याग केला.

या सर्व प्रकारांबद्दल नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन लेखणी बंद आंदोलन केले. तसेच सभागृहात अशा प्रकारच्या वर्तनाला त्वरित पायबंद न बसल्यास बेमुदत आंदोलनाचाही इशारा दिला आहे. नगर परिषदेच्या सभागृहात सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्याची आणि सभेच्या कामकाजाचे चित्रीकरण करण्याचीही मागणी कर्मचाऱ्यांनी या निवेदनात केली आहे. नगराध्यक्ष सावित्री होमकळस आणि ज्येष्ठ नगरसेवक सुचय रेडीज यांनीही या प्रकारांबद्दल स्पष्ट शब्दात नापसंती व्यक्त केली. मात्र त्याचवेळी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीबद्दल सर्वपक्षीय नाराजी आहे. त्यातूनच त्यांच्याविरूध्द अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.   कोकणात पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी खास महोत्सव येत्या शनिवारपासून (७मे)चिपळूणमध्ये सुरू होत असतानाच नगर परिषदेत गेल्या काही दिवसांमधील या घडामोडींमुळे वातावरण गढूळ झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2016 1:42 am

Web Title: distrust resolution may pass against chiplun municipal council officer
Next Stories
1 लिंग परिवर्तन केलेल्या विद्यार्थ्यांचा स्वतंत्र दर्जा ठेवण्याचे ‘यूजीसी’चे निर्देश
2 विदर्भातील अनेक भागात वादळी पावसाची हजेरी
3 युग चांडक हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा हायकोर्टाकडून कायम
Just Now!
X