स्थानिक संस्था करामुळे (एलबीटी) महानगरपालिकांचे उत्पन्न जकातीपेक्षा घटले आहे. त्यामुळे मनपा आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. एलबीटी आणि जकात यांच्या दरआकारणीतील तफावत दूर करण्याची गरज असून, त्यादृष्टीने सीए असोसिएशनसारख्या संस्थांनी यात मध्यममार्ग शोधण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी यांनी केले.
सीए असोसिएशनच्या नगर शाखेच्या वतीने एलबीटीवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष अजय मुथा, मनपाचे उपायुक्त महेशकुमार डोईफोडे, एलबीटीचे अभ्यासक कमलेश साबू (ठाणे), दिनेश गांधी आदी या वेळी उपस्थित होते.
कुलकर्णी यांनी या वेळी उपस्थित व्यापारी संघटनांच्या अडचणी समजून घेत त्यात कशा प्रकारे दिलासा देता येईल, याचा प्राधान्याने विचार करण्याचे आश्वासन दिले. साबू व दिनेश गांधी यांनी एलबीटीची रचना व त्यातील अडचणींविषयी या वेळी माहिती दिली. स्थानिक प्रशासनाने व्यापा-यांची बाजू राज्य सरकारकडे मांडावी असे आवाहनही त्यांनी केले. सीए असोसिएशनचे अध्यक्ष अजय मुथा यांनी सुरुवातीला या चर्चासत्रामागचा हेतू विशद करतानाच संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. या चर्चासत्रास शहरातील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. महेश भळगट यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद जांगडा यांनी आभार मानले.