‘मोठय़ा गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारशी वाटाघाटी सुरू’

नाशिकमधील अतिरिक्त पाणी मोठी गुंतवणूक केली तर जाकयवाडी व मराठवाडय़ाकडे वळवण्यासाठी शक्य आहे, त्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर वाटाघाटी सुरू आहेत, अद्याप निर्णय झाला नसला तरी तो होईल, याची खात्री वाटते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी आज, शनिवारी दिली.

नगर जिल्ह्य़ातील भेंडा (ता. नेवासा) येथे शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच माजी आमदार पांडुरंग अभंग यांचा अमृतमहोत्सव यानिमित्ताने दोघांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे होते. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. जयंत पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, यशवंतराव गडाख, मधुकर पिचड, खा. दिलीप गांधी, आ. दिलीप वळसे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संयोजक चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले, भास्करगिरी महाराज तसेच विविध पक्षांचे आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

यापुढे विशिष्ट वय झाल्यावर सत्ता, सत्तेबाहेर असे न वागता महाराष्ट्रातील कोणताही प्रश्न असो, त्यासाठी दिल्लीत आता एकत्र बसून, आपले-तुपले न पाहता केंद्राकडून प्रश्न सोडवण्यासाठी काम करायचे, असे निवृत्तीचे संकेतही शरद पवार यांनी आपल्या भाषणात दिले.

पंतप्रधान हा सर्व देशाचा असतो, नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात कर्जमाफी दिली, मग महाराष्ट्राने काय घोडे मारले आहे, त्यामुळे अंशत:, तत्वत: असे काही करत न बसता एकदाची सरसकट कर्जमाफी करूनच टाका, असे अवाहन पवार यांनी केले. शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देऊ असे लेखी आश्वासन देता मग आता मागे का फिरता, शेतकऱ्याला जर भाव, पाणी, वीज, खते दिली तर तो पुन्हा कशाला कर्जमाफी मागेल, कालच कारखाने, उद्योजकांना ८२ हजार कोटींची कर्जमाफी दिली आणि इकडे महाराष्ट्रात ३०, ४० हजार कोटी द्यायचे तर वाट पहायला लावत आहेत, असा टोला पवार यांनी केंद्र व राज्य सरकारला लगावला.

यावेळी विविध वक्त्यांची शरद पवार व पांडुरंग अभंग यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली. यावेळी अभंग यांच्या ‘शेतमळा ते विधानसभा’ या आत्मचरित्राचे प्रकाशनही पवार यांच्या हस्ते झाले. मोठा जनसमुदाय कार्यक्रमाला उपस्थित होता.

सरकारने घरात भांडणे लावली

कर्जमाफी द्यायची तर मोकळ्या हाताने द्या, उगाच दात कोरून देऊ नका, अशी टीका शरद पवार यांनी केली. कर्जमाफीच्या अर्जामुळे घरातच भांडणे लावण्याचा उद्योग सरकारने केला आहे, कर्जमाफी कोणाला हवी, भावांत कोणाला, वडील की मुलाला, नवऱ्याली की बायकोला याचे वाद सुरू झाले आहेत, याचाही उल्लेख त्यांनी केला. एकदा शेतकऱ्यांना सावरा, त्याच्या डोक्यावरील ओझे उतरवा, तोच शेतकरी महाष्ट्राचा चेहरामोहरा बदलून दाखवेल, सन २००४ मध्ये अन्न धान्य आयात करावे लागत होते. मात्र चांगला हमी भाव मिळताच आता देश अन्न धान्य निर्यात करू लागले आहे, असाच बदल तो घडवेल, असे पवार म्हणाले.

कर्जमाफीची सुरुवात १९७८ मध्ये

सन २००७ च्या कर्जमाफीपूर्वी याच नेवासे-शेवगाव भागात सन १९७८ मध्ये कर्जमाफी केली होती. त्यावेळी दुष्काळी कामे सुरू केली होती, ही कामे पाहण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या. परंतु नंतर या कामांच्या खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर चढवण्यात आला, आपण मुख्यमंत्री झाल्यावर बंिडगच्या कामाचा खर्च माफ करून शेतकऱ्यांवरील ते कर्ज उतरवले, त्यावेळी कर्जमाफीची सुरुवात झाली, असे पवार यांनी सांगितले.