News Flash

विदर्भात पक्षवाढीचे शिवधनुष्य रावतेंना पेलणार का?

परिवहनमंत्री म्हणूनही विदर्भाकडे दुर्लक्षच

दिवाकर रावते, परिवहन मंत्री

सत्तेत असूनही वेळोवेळी विरोधकांच्या भूमिकेत वावरणाऱ्या तसेच विदर्भात एकूणच गलितगात्र अवस्थेत असलेल्या शिवसेनेला उभारी देण्यासाठी ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी पक्षाची एकूणच अवस्था लक्षात घेता पक्षबांधणीचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीचा भाग म्हणूनच शिवसेनेने रावते यांच्यासारख्या आक्रमक नेत्याकडे सूत्रे सोपविली आहेत.

पक्ष संघटना बांधणीसाठी शिवसेनेने सहा मंत्र्यांना राज्याचे विविध विभाग वाटून दिले. जिल्ह्य़ाजिल्ह्य़ांमध्ये शिवसेना बळकट करण्याचे काम या नेत्यांकडे सोपविण्यात आले आहे. दिवाकर रावतेंना विदर्भ नवा नाही. मराठवाडय़ात सेना भक्कम करण्याचे श्रेय दिल्या जाणाऱ्या रावतेंवर विदर्भाची जबाबदारी आली. सत्ता नसताना रावतेंएवढी पायपीट एकाही नेत्याने केली नसल्याचा दाखला दिला जातो. सांत्वन दिंडी, कापूस दिंडी व कर्जमुक्तीसाठी ‘देता की जाता’ ही गुरुकुंज ते नागपूरदरम्यान काढलेली पदयात्रा असो, रावतेंनी विदर्भ पिंजून काढला होता. पुढे राजकीय सारीपाटात मात्र त्यांचे दान त्यांच्या पदरात पडले नाही. विदर्भात तीन आमदार व चार खासदार एवढीच पुंजी आहे. काही जिल्ह्य़ात संपर्कमंत्री आहेत. पण भाजपच्या बडय़ा नेत्यांच्या आहारी जाणारे काही सेना नेते व्यक्तिगत फायद्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, स्थानिक सेना नेत्यांना वालीच उरत नाही, अशी खंत शिवसैनिकांकडून व्यक्त केली जाते.

बहुतांश जिल्ह्य़ात सेना नावापुरतीच आहे. अमरावती जिल्ह्य़ात कधीकाळी गुण्यागोविंदाने नांदणारे अनंत गुढे, आनंदराव अडसूळ यांच्यात आता छत्तीसचा आकडा आहे. यवतमाळात खासदार भावना गवळी व आमदार संजय राठोड यांचे वैर जगजाहीर आहे. यवतमाळच्या जिल्हाप्रमुखाचा वाद ‘मातोश्री’वर पोहोचूनही शमलेला नाही. चंद्रपुरात आमदार बाळू धानोरकर व जिल्हाप्रमुख असलेले त्यांचे बंधू अनिल धानोरकर यांना पक्षवाढीचे सोयरसुतक नसल्याचे म्हटले जाते. कारण वरोरा, भद्रावती या क्षेत्रापलीकडे आपले कार्यक्षेत्र नसल्याची भूमिका धानोरकर बंधूंनी ठेवल्याचे कार्यकर्ते म्हणतात. आमदार भांगडिया यांनी सेना गिळंकृतच केली. भंडारा-गोंदियात तीच स्थिती आहे. वर्धा जिल्ह्य़ात एक तप सेना सांभाळणारे रविकांत बालपांडेंच्या बंडखोरीतून पक्ष फुटल्यानंतर जिल्हाध्यक्ष नीलेश देशमुख यांना पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी शोधाशोध करावी लागली. बुलढाण्यात खासदार प्रतापराव जाधव व युवा सेना सांभाळणारे त्यांचे पुत्र ऋषी जाधव सेनेची सद्दी कायम ठेवण्यात सध्या यशस्वी आहेत.

पश्चिम विदर्भ हा शिवसेनेचा, तर पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सध्या शिवसेनेने दोन्ही भागांत पक्षविस्ताराचे लक्ष्य पुढे ठेवले आहे. ‘मिशन विदर्भ’च्या माध्यमातून भाजपला शह देण्याचा सेना नेतृत्वाचा प्रयत्न आहे. विदर्भात यश मिळाल्याशिवाय राज्यात एकहाती सत्ता काबीज करणे शक्य नसल्याची जाणीव सेनेला आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये विदर्भात भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे स्थानिक पातळीवर सेनेची कोंडी झाली होती.

रावतेंकडे सूत्रे आल्यावर विदर्भात सेनेमध्ये ‘कही खुशी, कही गम’चे वातावरण आहे. पक्ष नेतृत्वाच्या बठकीत काही आमदारांनी रावतेंच्या विरोधातील सूर आळवल्याची माहिती आहे. त्यामुळे संघटना मजबूत होण्याऐवजी गटबाजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. रावते सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन काम करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

परिवहनमंत्री म्हणूनही विदर्भाकडे दुर्लक्षच

परिवहनमंत्री म्हणूनही दिवाकर रावते यांनी विदर्भाकडे दुर्लक्ष केल्याची ओरड आहे. मोडकळीस आलेल्या एसटी बसेस विदर्भात चालवल्या जातात. एसटी महामंडळ व परिवहन विभागाच्या रिक्त पदे, इमारतींचा प्रश्न कायम आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील दलाली कायम असून, दिरंगाईमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. इतरही अनेक समस्यांनी परिवहन विभागाला घेरले आहे.

पक्ष बळकट करण्यासाठी नियोजन करू – रावते

शिवसेना पक्षप्रमुखांनी विदर्भाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे विदर्भात शिवसेना बळकट करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. या जबाबदारीमुळे पक्षातील कोणी नाराज असतील तर त्याची कल्पना नाही, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 1:46 am

Web Title: diwakar raote preparation of vidarbha elections
Next Stories
1 दारू दुकानांबाबत मंगळवारी भूमिका मांडणार
2 धुळ्यात १५०० रुपयांची लाच घेताना कर्मचाऱ्यास अटक
3 जळगाव महानगरपालिकेत मनसेचा महापौर?
Just Now!
X