यंदाचा दिवाळीचा सिझन हा मुंबईतील बांधकाम क्षेत्रासाठी गेल्या दोन वर्षातील सर्वोत्कृष्ठ सिझन ठरला आहे. कारण नोव्हेंबर २०१८ पासून यंदाच्या दिवाळीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर घरांची विक्री झाली आहे. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील डेटावरुन ही बाब समोर आली आहे. स्केअर फीट इंडिया या वेबसाइटने याबाबत वृत्त दिलं आहे.

यंदाचं वर्ष हे करोनाच्या संकटामुळे जवळपास सर्वच व्यावसायांसाठी वाईट ठरलेलं असताना मुंबईतील बांधकाम क्षेत्रासाठी मात्र ते दिलासादायक ठरलं आहे. सुरुवातीला करोनाच्या संसर्गामुळं संपूर्ण देश भीतीच्या सावटाखाली गेला त्यानंतर सुरु झालेल्या लॉकडाउनने अनेक व्यावसायांना मोठ्या कालावधीसाठी सक्तीनं बंद करावे लागले. अर्ध्या वर्षाहून अधिक काळ लॉकडाउनमुळे बांधकाम क्षेत्रालाही मोठं नुकसान सोसावं लागलं.

दरम्यान, गृह खरेदीत सप्टेंबर महिन्यापासून वेग धरला. कारण बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी राज्य सरकारनं मुंद्रांक शुल्कात कपात घोषीत केली. त्याचाच हा चांगला परिणाम दिसून आला. त्याचबरोबर या उभारीला आणखी एक कारण कारणीभूत ठरलं ते म्हणजे बांधकाम क्षेत्रात राबवली गेलेली बलुतेदारी पद्धत (मालाची आदलाबदल करुन व्यवहार करणे). मुंबईतील एका कंत्राटदाराने याबाबत सांगितलं, “गेल्या सहा महिन्यांत आम्ही पाच ते सहा प्रकल्पांमध्ये अशा प्रकारे काम केलं. बाजारात पैशाची कमतरता असल्याने या पद्धतीनं काम करणं भाग होतं.”

कर्मा रिएलेटर्सच्या याशिका रोहिरा म्हणाल्या, “नवीन विक्री, जुनी अनोंदणीकृत कागदपत्रे, कंत्राटदारांची बलुतेदारी पद्धतीची नोंद तसेच काही वित्तीय संस्थांचं वित्तीय कंपन्यांमध्ये झालेलं रुपांतरण यामुळे नव्या घरांच्या नोंदणीची संख्या वाढली. अनेक ग्राहक तर आम्हाला कमी मुंद्रांक शुल्कांचा लाभ विचारत आहेत.”

दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिना काहीसा चांगला होता. या महिन्यांत मुंबईत एकूण ७,९२९ घरांच्या विक्रीची नोंद झाली. त्यानंतर आलेल्या दिवाळी सणानिमित्त विकसकांकडून देण्यात आलेल्या विविध ऑफर्स आणि त्याच्या जोडीला सरकारने दिलेली २ टक्के मुंद्रांक शुल्काची सोय याचा फायदा मोठ्या प्रमाणावर घरांची विक्री होण्यात झाला.