दिवाळीनिमित्त एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. एसटी महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे एक लाख १० हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे दोन हजार आणि पाच हजार इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे. आचारसंहिता अद्यापही असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.

दरम्यान केंद्र व राज्यशासनाप्रमाणे देय असलेला तीन टक्के महागाई भत्ता १ जानेवारी 2019 पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यापैकी माहे ऑक्टोबरच्या वेतनामध्ये सदर 3 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2019 पर्यंतचा थकित महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय यथावकाश घेण्यात येईल. त्यामुळे यंदाची दिवाळीही एस.टी कर्मचाऱ्यांना आनंदाची होणार आहे.

१० टक्के हंगामी दरवाढ
२५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरच्या दरम्यान एसटीची १० टक्के हंगामी दरवाढ करण्यात आली आहे. एस.टी. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही १० टक्के भाडेवाढ करण्यात आली असून २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. ही भाडेवाढ ५ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) व शिवशाही (आसन) या बसेसला लागू राहील. ही भाडेवाढ शिवशाही (शयनयान), शिवनेरी व अश्वमेध या बसेसला लागू होणार नाही.

दिवाळीच्या जादा वाहतूकीसाठी एस.टी. सज्ज
दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळातर्फे २४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे ३५०० बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये लांब पल्ल्याच्या जादा वाहतूकीबरोबरच स्थानिक स्तरावर आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.