दिवाळी आणि फटाके हे समीकरण इतके घट्ट झाले आहे की, फटाक्याविना दिवाळी साजरी केल्याचा आनंदच मिळत नाही. मात्र, पूर्वापार चालत असलेल्या आवाजी फटाक्यांच्या परंपरेला अलिकडच्या काळात छेद मिळाला आहे. पर्यावरणाबाबतची जागरूकता आणि ध्वनीप्रदुषणाबाबतची मर्यादा यांमुळे दणदणाट करणाऱ्या सुतळी बॉम्ब, लवंगी फटाके, तोटे यांना बाजूला सारून आकाश उजळवून टाकणाऱ्या विविधरंगी फटाक्यांची मागणी केली जात आहे.

बेन्टेन, छोटा भीम, पॉवररेंजर्स..

लहान मुलांसाठी आकर्षण असणाऱ्या बेन्टेन, छोटा भीम आणि पॉवररेंजर्स या कार्टूनमधील पात्रांच्या नावाने हे फटाके बाजारात उपलब्ध आहेत. हे फटाके लावल्यानंतर साधारण १२ फूट ते १५ फूट (इमारतीचा एक ते दीड मजला) वर जाऊन ते फुटतात आणि त्यातून विविध रंग बाहेर पडतात. बेन्टेन हा फटाका लाल आणि हिरवा या रंगात तर छोटा भीम फटाका चंदेरी रंगात आणि पॉवररेंजर्स हा फटाका लाल, चंदेरी व हिरवा अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे.

रंग बदलणारी फुलपाखरे

हा फटाका लावल्यानंतर त्यातून क्रमश: विविध रंग बाहेर पडतात. लाल, पिवळा, हिरवा असे विविध रंग कलर्स चेंजिंग बटरफ्लायमधून बाहेर पडतात. त्याचप्रमाणे हा फटाका आवाजविरहित असल्याने तो ग्राहकांच्या पसंतीस पडतो.

भुईचक्र

‘म्युझिकल व्हील’ म्हणजेच ‘चकरी’चा फटाका. ‘भुईचक्र’ या नावाने हा फटाका सर्वश्रुत आहे. हा फटाका लावल्यानंतर भुईचक्र जमिनीवर गोल फिरते आणि त्यातून ‘ची’ असा शिट्टीचा आवाज बाहेर पडतो.  त्याचप्रमाणे ‘चायना व्हील’ हा फटाका भुईचक्राचाच प्रकार आहे. हा फटाका लावल्यानंतर भुईचक्र जमिनीवर तीनदा गोल फिरते.

क्रॅकलिंग पाऊस

क्रॅकलींग पाऊस हे ‘पाऊस’ या फटाक्याचे विकसित रूप म्हणता येईल. क्रॅकलींग पाऊस हा फटाका लावल्यानंतर त्यातून सोनेरी रंगाचा पाऊस बाहेर पडतो आणि त्यासोबतच ‘करकर’ असा क्रॅकलिंग आवाजही येतो.याशिवाय ‘कलर्स स्मोक फाऊंटन’, ‘जेट फाऊंटन’, ‘गोल्डन व्हीसल’, ‘हनिमून क्रॅकलिंग’,  मॅजिक क्रॅकलिंग अशा  पाऊसवजा फटाक्यांचीही बाजारात रेलचेल आहे.

पल्र्सड्रॉप

पर्ल्सड्रॉप या फटाक्यामध्ये भुईचक्र आणि पाऊस या दोन वेगळ्या फटाक्यांचे मिश्रण आहे. पर्ल्सड्रॉप हा फटाका लावल्यानंतर त्यामधून प्रथम पाऊस बाहेर पडतो. त्यानंतर पाऊसामधून पाच भुईचक्र बाहेर पडून ती जमिनीवर गोल फिरू लागतात. पर्ल्सड्रॉप हा फटाका फोडल्यानंतर भुईचक्र आणि पाऊस हे दोनही फटाके लावल्याचा आनंद लहान मुलांना मिळतो.

बारा कलर

बारा कलर हा फटाका जमिनीवर लावला जातो. फटाका लावल्यानंतर फटाक्याचा आवाज आपल्याला ऐकायला येतो. त्यानंतर हा फटाका थेट आकाशात जाऊन फुटतो आणि बारा प्रकारचे विविध रंग बाहेर फेकतो.

नॉव्हेल्टी

हवेत जाऊन फुटणाऱ्या फटाक्यांमध्ये नॉव्हेल्टी या फटाक्याचीही चलती आहे. नॉव्हेल्टी फटाक्याच्या पाकिटात दोन स्वतंत्र फटाके मिळतात. हा फटाकाही जमिनीवर लावण्यात येतो. फटाका लावल्यानंतर त्याचा आवाज आपल्याला ऐकायला येतो. त्यानंतर हा फटाका आकाशात जाऊन फुटतो. हा फटाका लाल, हिरवा, पिवळा, संमिश्र रंग अशा विविध रंग प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.