पुरुषस्पंदनं
पुरुषस्पंदनंचा हा दिवाळी अंक शिक्षण आणि नातेसंबंध विशेषांक असून त्यात या दोन्ही विषयांवरील लेख, कथा, कवितांचा समावेश आहे. शिक्षणव्यवस्था आणि लिंगभाव यांचा परस्परसंबंध यांच्यावर मराठीत असलेली उणीव लक्षात घेऊन त्या नात्याचा साकल्याने वेध घेण्याचा प्रयत्न या अंकात आहे. गेल्या काही वर्षांत राज्यातील महाविद्यालयांच्या कॅम्पसवरील वातावरणात जो बदल झाला आहे तोही प्रा. रजनीकांत सोनार, डॉ. चैत्रा रेडकर, अश्विनी सातव- डोके, मयूरेश भडसावळे आणि यशवंत कमल यांच्या लेखांमधून प्रभावीपणे टिपला गेला आहे. गुरू-शिष्य परंपरा आणि स्त्री-पुरुष नाते या विषयावर नीला भागवत, वैभव आरेकर आणि सारंग भाकरे यांनी प्रकाश टाकला आहे.
स्त्री-पुरुष समानता येण्यासाठी लैंगिक शिक्षणाची गरज, समाजात समजूतदारपणा आणि मोकळेपणा येण्याची गरज, बालविवाह रोखण्याची आवश्यकता या विषयांवर सीमा केतकर, किरण इनामदार, प्रगती बाणखेले, प्रा. अश्विनी धोंगडे यांच्या लेखांमधून प्रतीत झाली आहे. गुरुनाथ तेंडुलकर, ऐश्वर्य पाटेकर, अनिल दाभाडे, वैभव साटम यांच्या ललित लिखाणातून बदलते सामाजिक वास्तव नेमकेपणाने मांडले आहे. याशिवाय हेमंत जोगळेकर, लोकनाथ यशवंत, अरुण इंगवले, प्रशांत असनारे यांच्या कविता रसिकांची अभिरुची समृद्ध करणाऱ्या आहेत. अनिल दाभाडे यांच्या आशयगर्भ मुखपृष्ठ रचनेने अंकाची शोभा वाढवली आहे.
संपादक – हरीश सदानी, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, पाने – १८८, किंमत – १२० रुपये

संवाद
संवादचा हा तिसराच अंक असला तरी विषयांची निवड, प्रगल्भता, साधी-सरळ मांडणी याबाबतीत अंक उल्लेखनीय आहे. जगण्याचा संघर्ष समर्थपणे पेलून आपलेच नव्हे तर समाजाचेही अनुभवविश्व समृद्ध करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची बोलके कथने या अंकात समाविष्ट आहेत. रावसाहेब कसबे, इंदुमती जोंधळे, वीरा राठोड यांनी हा विभाग समृद्ध केला आहे. अशोक कोळी यांच्या दीर्घकथेत शेतकऱ्याची अडचणींवर मात करून जमिनीत पाय रोवून उभे राहण्याची जिद्द प्रतीत होते. ज्येष्ठ लेखक मनोहर शहाणे, नागनाथ कोत्तापल्ले, बाबाराव मुसळे, राजन खान, अंबरीश मिश्र, शेषराव मोरे, रेणू दांडेकर, हेरंब कुलकर्णी, अरुणा ढेरे यांच्या सजग लिखाणातून वेगळा अनुभव वाचकांना मिळतो. ताज्या दमाचे नाटककार दत्ता पाटील यांचा प्रायोगिक दीर्घाक ‘गढीवरच्या पोरी’ वाचनीय आहे. मंगेश पाडगावकरांच्या ‘वाहवा’पासून अनेक कविता अंक समृद्ध करतात. सुभाष अवचट यांचे देखणे मुखपृष्ठ अंकाला लाभले आहे. याशिवाय जागोजागी पेरलेली वैशिष्टय़पूर्ण व कथांना पूरक रेखाचित्रे आणि दिवाळी अंकाचे व्यवच्छेदक लक्षण असलेली व्यंगचित्रे यांनी अंक परिपूर्ण बनला आहे.
संपादक – किशोर पाठक, पाने – २२४, किंमत – १५० रुपये

विवेक
साप्ताहिकाची अमृतमहोत्सवी परंपरा असणाऱ्या विवेकचा दिवाळी अंक भरगच्च मजकूर घेऊन आला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचा ‘संघटना हेच सूत्र असावे’ हा लेख म्हणजे त्यांच्या विजयादशमीच्या भाषणाचा गोषवारा आहे. संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू असल्याने त्यांच्या एका भाषणातील निवडक भाग ‘संघटित हिंदू समाज विषमतारहित असावा’ या शीर्षकाखाली पुनप्र्रकाशित करण्यात आला आहे. रमेश पतंगे यांनी देवरसांवर लिहिलेला लेखही वाचनीय आहे. याशिवाय नास्तिकाचे अध्यात्म (दिलीप करंबेळकर) व आस्तिकाचे अध्यात्म (डॉ. प्रमोद पाठक) हे लेखही आगळेवेगळे आहेत. आयसिस या दहशतवादी संघटनेकडून होत असलेल्या हिंसेच्या पाश्र्वभूमीवर डॉ. शेषराव मोरे यांनी लिहिलेला ‘इस्लामिक स्टेटची ऐतिहासिक मुळे’ हा लेख संग्राह्य़ ठरावा असाच आहे. कथा, कविता, व्यक्तिचित्रे, ललित लेख यांनीही हा अंक सजला आहे.
प्रबंध संपादक- दिलीप करंबेळकर, पाने ४२२, किंमत- १७५ रुपये

ग्रहवेध
ज्योतिषप्रेमी मंडळींसाठी पर्वणीचा ठरावा अशा ग्रहवेध दिवाळी अंकाचे यंदाचे पंचविसावे वर्ष. हा पूर्ण अंक ज्योतिषशास्त्रालाच वाहिलेला आहे.
डॉ. बी. व्ही. रमण यांचा भविष्य वर्तविताना येणाऱ्या काही संभ्रमावस्था व डॉ. प. वि. वर्तक यांचा अध्यात्म मार्गावरील काही अनुभव हे लेख वाचनीय आहेत. डॉ. रघुनाथ शुक्ल यांचा शिवलिंगातील चैतन्य विज्ञान हा लेखही माहितीपूर्ण आहे.
दिवंगत सिनेपत्रकार इसाक मुजावर यांनी कथन केलेल्या चित्रपटसृष्टीतील ज्योतिषविषयक गमतीजमती बहार आणतात.
यंदा पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या गाईड चित्रपटावर डॉ. प्रकाश जोशी यांनी लिहिलेला लेखही चांगला जमला आहे. या चित्रपटाची कुंडली मांडून या चित्रपटाच्या यशाची चिकित्सा करण्यात आली आहे. ४२वर्षे कोमात राहून मरण पावलेल्या अरुणा शानबाग या दुर्दैवी परिचारिकेचा मृत्यूही ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून पाहण्यात आला आहे.
संपादक- डॉ. उदय ह. मुळगुंद, पाने २००, किंमत- १०० रुपये

रंगश्रेयाली
गेली १८ वर्षे सातत्याने अंक प्रकाशित होत आहे. या अंकात अभ्यंगस्नान आणि प्रकृतिस्वास्थ्य याचा परस्पर संबंध असलेला स्वप्निल वाडेकर यांचा माहितीपूर्ण लेख आहे. शुभदा कुळकर्णी यांची ‘सुटका’, सुनीती वाघ यांची ‘टेन्शन’, अरविंद साळवी यांची ‘नारायणाचा सत्यनारायण’ आणि ज्योती आठल्ये यांची ‘मूळ स्वभाव जाईना!’ आदींच्या सुरस व विनोदी कथा वाचनीय आहेत. प्रा. प्रतिभा सराफ, माधव गवाणकर, डॉ. श्रीरंग बखले यांच्या कवितांची मैफल रंगली आहे. वैद्य खडिवाले, डॉ. रवी बापट, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. रवींद्र गुरव यांचे अनुक्रमे अंगावर पांढरे डाग, सृदृढ आरोग्याची सूत्रे, अपचन, स्तनाचा कर्करोग आदींवर रामबाण उपाय सांगणारे लेख आहेत. वास्तुशास्त्र, वार्षिक राशिभविष्य यांचाही समावेश आहे. संजय मिस्त्री यांची व्यंगचित्रे फारच मार्मिक आहेत.
संपादक – अरविंद साळवी, पाने – १२८, किंमत – ७० रुपये