मौज
परंपरेनुरूप ललित आणि वैचारिक साहित्य वाचनाची परमोच्च अवस्था प्राप्त करून देणाऱ्या चिरतरुण मौजेचे यंदाचे सर्वात मोठे आकर्षण पुन्हा फॉर्मात आलेल्या भारत सासणेंची ‘आय थिंक देअर फोर आय एम’ ही दीर्घकथा. देकार्तच्या तत्त्वज्ञाचा त्यांच्या सूक्ष्मलक्ष्यी कथारत्नासाठी झालेला वापर वाचकांवर कैक दिवस भुरळ घालेल. अन् त्यातून बाहेर पडल्यावरही वाचकांची सतीश तांबे यांच्या ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ या दीर्घ-लघुच्या आसपास वावरणाऱ्या कथेतून सुटका नाही. गोविंद तळवलकर, विजय कुवळेकर या दादा- संपादकांचे लेख अनुक्रमे सुभाषबाबू आणि खुशवंत सिंग या तितक्याच दादा व्यक्तींविषयी नवे काही सांगू पाहणारे. ललित लेखनात विनया जंगले यांचा उंटाच्या सहवासात आणि इल्से.. , अनिल गोविलकरांचा सिंफनी आणि भारतीय संगीत हे लेख अनुभव आणि अभ्यास यांची सांगड घालून तयार झालेले खास रसायन आहे. यंदा ‘शहरी संस्कृती : भूमिका’ या परिसंवादाद्वारे मान्यवरांचे विचारसोने आहेच. त्यासोबत मौजेच्या अनिल अवचट, सानिया, विजय पाडळकर आदी प्रभावळींची सशक्त उपस्थिती आहेच.
संपादक : मोनिका गजेंद्रगडकर, किंमत : १५० रु.

अंतर्नाद
दि. बा. मोकाशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कथास्पर्धातील निवडलेल्या तीन कथा आकर्षण आहे, तितकेच मोकाशी यांच्या कथालेखनासंबंधी त्यांच्या पत्नीने लिहून ठेवलेल्या आठवणी आणि कथाप्रेमींसाठी भरघोस वाचनखाद्य अंतर्नाद मासिकाच्या दिवाळी अंकाने उपलब्ध करून दिले आहे. राजेंद्र बनहट्टी यांनी नवकथेच्या शिलेदारांपैकी एक कथालेखक अरविंद गोखले यांच्या जागविलेल्या आठवणी, करेल चापेक या झेक लेखकाविषयी माहिती आणि सोबत त्याची गाजलेली लघुकथा असा खास विजय पाडळकर यांचा लेखऐवज, सध्या समीक्षणासोबत कथाप्रांतात नाव कमावणारे गणेश मतकरी यांची मुलाखत हे आवर्जून उल्लेखावे असे. दि. बा मोकाशींच्या कथालेखनाचा शिरस्ता आणि त्यांच्या गाजलेल्या कथांचा निर्मिती काल आणि माणूस-लेखक म्हणून खूप काही देणाऱ्या मालिनी मोकाशी यांच्या आठवणी अंकाचे
संग्रहमूल्य वाढविणारे आहे. तंत्रज्ञानाच्या वेगात आज लयाला जात असलेल्या पत्रसंस्कृतीवर अंजली कीर्तने व राजन हर्षे यांनी
रेखाटलेला आविष्कार आणि बऱ्याच वाचनीय लेख, कथा, कवितांचा आस्वाद वाचनानंद द्विगुणीत करणारा आहे.
संपादक : भानू काळे, किंमत २०० रु.

पद्मगंधा
नेमाडपंथी आणि नेमाडेविरोधी अशा दोन्ही गटांना सहज आवडून जाईल असा भालचंद्र नेमाडय़ांवरील ‘नेमाडे: नवे आकलन’ हा अंकाची सुरुवात करून देणारा लेख मुख्य आकर्षण म्हणण्याइतपत वठला आहे. पण दरवर्षी एका विषयाला अनुरूप सकस लेखन प्रथितयश आणि नवोदितांकडून मिळवून देणाऱ्या अंकाचे खरे आकर्षण एकलेपण आतील व बाहेरचे, या संकल्पनेचे आहे. शर्मिला फडके यांचा व्हॅन गॉगवर, चंद्रशेखर चिंगरे यांचा एमिली डिकन्सच्या कवितांवर, संजय आर्वीकरांचा विलास सारंगावर लिहिलेल्या व्यक्तिरूपी लेखनातील सर्व शक्यतांना विस्तारणारे ठरले आहेत. गणेश देवी, श्रीकांत बोजेवार, अनिल किणीकर, विजयराज बोधनकर, शेखर देशमुख आदींचा या विशेष विभागात सहभाग आहे. प्रतिभा रानडे, नरेंद्र चपळगावकर यांचे लेख, नागनाथ कोत्तापल्ले, नीलिमा बोरवणकर, मानसी होळेहोन्नुर, बब्रूवान रुद्रकंठावार यांच्या कथा आणि दिग्गजांच्या कविता असा एकूण दृष्ट काढून वाचावा असा नेहमीप्रमाणे देखणा अंक काढण्यात आला आहे.
संपादक : अरुण जाखडे,
किंमत : १५० रु.

साद
मराठी विचारधारा प्रतिष्ठानच्या यंदाच्या साद या दिवाळी अंकाची केंद्रीय संकल्पना आहे वैविध्यपूर्ण महाराष्ट्र. या अंकात महाराष्ट्राचा इतिहास, भौगोलिक विविधता, संतपरंपरा, खाद्यसंस्कृती, लोककला आदींचा धांडोळा घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या काव्यपरंपरेचा आढावा घेणारा लेख आणि मनाचा ठाव घेणाऱ्या कथा आणि कविता अंकात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे वैविध्य जाणून घेण्यासाठी मराठी जनांनी हा अंक वाचायलाच हवा.
संपादक – सुनील देशपांडे, किंमत झ्र् १५०