05 March 2021

News Flash

दिवाळी अंकांचे स्वागत..

मराठय़ांच्या इतिहासात १६८९ मध्ये उद्भवलेला भयंकर प्रसंग म्हणजे ‘रायगडाचा पाडाव’.

ललित
मराठीतील चोखंदळ वाचकांच्या सर्व गरजा भागविणाऱ्या ‘ललित’ मासिकाचा दिवाळी अंक वाचकाला ग्रंथप्रेमाचे भरते आणण्यात कायम यशस्वी ठरतो. विशिष्ट विषयाचे अनेक पैलू मांडणारा विभाग, नव्या-जुन्या देशविदेशी लेखकांवर प्रकाश पाडणारे मान्यवरांचे दणकट लिखाण आदी अनेक बाबींनी हा अंक समृद्ध असतो. यंदा ‘प्रकाशन क्षेत्रातील संपादकांची भूमिका’ या लेखमालेद्वारे दिग्गज संपादक आणि लेखकांना ललितने एकत्र आणले आहे. रत्नाकर मतकरी, मिलिंद बोकील, नीरजा, मोनिका गजेंद्रगडकर, आसाराम लोमटे, विनय हर्डीकर, मृदुला प्रभुराम जोशी, विनया खडपेकर आदींनी संपादन-संपादक या प्रक्रियेची साहित्य विकासाला गरज नक्की किती व कशी, याचा आढावा घेतला आहे. यातील विनय हर्डीकर यांचा लेख प्रत्येक साहित्यप्रेमी आणि साहित्यिकांच्या अनेक धारणांना छेद देणारा, म्हणून महत्त्वपूर्ण ठरावा असा आहे. गोविंद तळवलकर यांचा डॉ. झिवागोचा इतिहास, वसंत आबाजी डहाके यांनी मंगेश नारायणराव काळे यांच्या चित्रांवर लिहिलेला लेख, दीपक घारे यांनी किप्लिंग पिता-पुत्रांच्या अज्ञात पैलूवर पुस्तकाचा आधार घेऊन लिहिलेला लेख, अरुण नेरुरकरांचा एडगर अ‍ॅलन पो याचे रेखाटलेले व्यक्तिचित्र आदी उल्लेखनीय लेखनासोबत ललितचा नेहमीचा वाचनानंद याही वर्षी शाबूत आहे.
संपादक : अशोक कोठावळे
पृष्ठे : १९२, किंमत १२० रु.

कोकण इतिहास पत्रिका
मराठय़ांच्या इतिहासात १६८९ मध्ये उद्भवलेला भयंकर प्रसंग म्हणजे ‘रायगडाचा पाडाव’. हा केवळ पराभव नव्हता, तर राष्ट्राची अस्मिता दुखावणारी अपमानकारक घटना होती. या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मराठे कसे वागले? त्यांच्या नेतृत्वाने दाखवलेले असामान्य गुण, शिवछत्रपतींचे वारसदार म्हणून त्यांच्या हातून घडलेले वर्तन या सगळ्याचा वेध ‘कोकण इतिहास परिषदे’च्या ‘कोकण इतिहास पत्रिका’ या दिवाळी अंकातून घेण्यात आला आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘रायगडचा पाडाव : एक दु:खद संकट पर्व’ या लेखातून हे मांडले आहे. अभ्यासकांसाठी अस्सल ऐतिहासिक साधनसामग्री ठरणाऱ्या या अंकामधून कोकण प्रदेशाचा विश्वसनीय इतिहास समजण्यास मदत होऊ शकते. कल्याणच्या विष्णू मूर्ती संदर्भातील डॉ. अ. प्र. जामखेडेकर आणि डॉ. अरुणचंद्र पाठक यांच्या माहितीपर लेख यात असून मराठी रंगभूमी परंपरा रवींद्र लाड यांनी उलगडली आहे. या शिवाय वाचकांना इतिहासविषयक कुतूहल निर्माण करणारे आणि परिपूर्ण माहिती देणारे असे लेख आहेत.
संपादक : डॉ. अरुण जोशी
पाने- ९२, किंमत- ६०

आनंदाचे डोही
प्रगत भारताचे स्वप्न दाखवणारे आणि ते पूर्ण करण्यासाठी ‘भारत २०२०’ हा कार्यक्रम देणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नाचा वेध घेणारी मुखपृष्ठ कथा हे यंदाच्या ‘आनंदाचे डोही’ या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ आहे. कलामांच्या ‘मिसाइल मॅन’ या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारे मुखपृष्ठ लक्षवेधी ठरते. या शिवाय या अंकामध्ये ‘बायबलमधील स्त्रीची प्रतिमा’ हा प्रा. फ्रान्सिस दिब्रिटो यांचा लेख, तर ‘गीतारहस्य आणि आपण’ हा दा. कृ. सोमण यांचा लेख अध्यात्माचा एक वेगळा आविष्कार समोर आणतो. मराठी वाहिन्यांवर लोकप्रिय ठरलेल्या ‘जय मल्हार’ या मालिकानिमित्ताने जेजुरीच्या खंडोबाच्या लोककथा आणि त्यामागील इतिहास सदाशिव टेटविलकर यांनी उलगडला आहे. तर ‘कास एक रोमान्स’ हा विजयराज बोधनकर यांचा लेख कास पठाराची सफर घडवतो. नाटय़ संमेलन अध्यक्षा फैय्याज यांची कवी अरुण म्हात्रे यांनी घेतलेली मुलाखत ‘लागी करेजवा कटार’ संगीत नाटकापासून ते गद्य नाटकापर्यंतचा ५० वर्षांचा काळ उलगडणारी आहे.
संपादक : विश्वनाथ साळवी
पाने- १७९, किंमत- १०५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 12:30 am

Web Title: diwali magazine 6
टॅग : Diwali,Magazine
Next Stories
1 चंद्रपूर जिल्ह्य़ातील प्रदूषणाबद्दल वेकोलिसह उद्योगांना नोटिसा
2 सावंतवाडी टर्मिनसचे काम धिम्या गतीने
3 दिवाळी अंकांचे स्वागत..
Just Now!
X