उद्याचा मराठवाडा
देशात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तेवर आल्यापासून असहिष्णुता पर्व सुरू झाले आहे. त्याचा फटका अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बसत आहे. हेच सूत्र घेऊन ‘उद्याचा मराठवाडा’ दिवाळी अंक अभिव्यक्तीच्या विविध आयामांना भिडला आहे. जात आणि सांस्कृतिक भांडवलाच्या माध्यमातून अभिव्यक्तीची नियमनप्रक्रिया उलगडून सांगणारे डॉ. आनंद पाटील, कलावंत व सत्तापिपासू राज्यकर्ते यांच्यातील संघर्षांचे प्रतीक बनलेल्या रशियन साहित्यिक बोरिस पास्तरनाकला केंद्रस्थानी ठेवून लिहिणारे विजय पाडळकर, पुरुषी वर्चस्ववादाखाली दबलेल्या स्त्रीचा वेध घेणाऱ्या डॉ. अश्विनी धोंगडे, पुरोगाम्यांची घुसमट मांडणारे संजय जोशी, इराणी दिग्दर्शक जफर पनाहीच्या निमित्ताने दहशतीच्या वातावरणातील घुसमट रेखाटणाऱ्या सोनाली नवांगुळ, माध्यम अभिव्यक्तीवरील नियंत्रणाचा उलगडा करणारे संजय आवटे आदी दिग्गजांच्या अर्थगर्भ चिंतनाने हा अंक आशयसंपृक्त झाला आहे.
संपादक : राम शेवडीकर
किंमत : १५० रुपये.
***********
इत्यादी मनोविकास
विवेकवादाची पाठराखण करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या झाल्यानंतर देशभर पुरस्कारपरतीचे सत्र सुरू झाले. यंदाचा इत्यादी मनोविकास हा दिवाळी अंक या तीन विचारवंतांना समर्पित आहे. मेधा कुलकर्णी यांच्या विवेकाचा दिवा विझू न द्यावा या लेखात पुष्पा भावे यांची मुलाखत देण्यात आली असून त्याद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. श्रुती सडोलीकर-काटकर यांचा लखनऊतले दिवस, मुकुंद कुळे यांचा देवदासी आणि नृत्यविरोधी चळवळ हे लेख वाचनीय आहेत. अरविंद गोखले, नरेंद्र चपळगावकर यांचे परराष्ट्र धोरण आणि इतिहासावरील लेख
वाचकांच्या माहितीत भर घालणारे आहेत. पंकज भोसले यांची ‘ट्विंकल ट्विंकल रेचल स्टार’ ही कथा निश्चितपणे वाचकांच्या पसंतीस उतरेल अशीच आहे.
संपादक : आशीष पाटकर
किंमत : १५० रुपये.
***********
गार्गी
मुंबईच्या श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कथा स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त कथा या अंकात देण्यात आल्या आहेत. त्यात प्रा. स्वाती दामोदरे यांची कळी उमलताना, वैदेही केवटे यांची स्वयंसिद्धा, संजय पुराणिक (सुटका), सविता कानडे (माडी), ललिता वैद्य (अनपेक्षित), शोभना कारंथ ( नशीब) तर शरद पुराणिक यांची आजही येईल का माझी रजनीगंधा कथेचा समावेश आहे. सर्व कथा मनाला स्पर्शून जाणाऱ्या आहेत. कवी प्रवीण दवणे यांची आंदोल, सुधीर सुखटणकर यांची अतिथी देवी भव, शुभदा साने यांची अपराध आदींच्या कथाही वाचनीय आहेत.
संपादक : श्रीनिवास शिरसेकर
किंमत : १००
***********
चैत्राली
यंदाचा चैत्राली दिवाळी अंक जागतिक मराठी साहित्य विशेषांक म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे. मराठी भाषेची महती सांगणारे प्रा द. दि. पुंडे यांचा मराठी राष्ट्रीय संवेदन भाषा, शशिकांत काळे यांचा माय मराठी, आरती दातार (आपुलकी जागं करणारं पसायदान), स्टॅन्ली गोन्सालवीस, श्मामला पानसे, विलास फडके शिवराज प्रभू यांचा कोर्लाईची पोर्तुगीज -मराठी आदींचे वैचारिक लेख अंकात आहेत. गरुडझेप या सदरात बांधकाम साहित्यिक डी.एस.कुलकर्णी, रोजगारसम्राट हरीश परुळकर, जगप्रसिद्ध संशोधिका मादाम क्युरी यांचा जीवनप्रवास तसेच डॉ.अनंत लाभलेटवार, सुनीता कातरकर, शरद पुराणिक यांची निसर्ग प्रवास यात्रा सुखद अनुभव देतो.
संपादक : रमेश द. पाटील
किंमत : १३० रुपये.