साहित्य सूची

एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडताना मुलाखतकाराचे कसब पणाला लागते. त्यामुळे मुलाखतकारांचे कौतुक वाटणे ओघाने आलेच. ‘साहित्य सूची’च्या यंदाच्या दिवाळी अंकाने हीच मुलाखतकार माणसे समजून घेण्याचे आव्हान पेलले आहे. या अंकात करण थापर, सुधीर गाडगीळ, सुनंदन लेले, अवधूत गुप्ते, राजू परुळेकर आणि समीरण वाळवेकर या प्रथितयश मुलाखतकारांच्या मुलाखती आहेत. या अंकात त्यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला आहे. शिवाय गोल्डा मायरपासून इंदिरा गांधींपर्यंत आणि यासीर अराफत यांच्यापासून हेन्री किसींजर यांच्यापर्यंत महान नेत्यांच्या मुलाखती घेणाऱ्या प्रख्यात राजकीय मुलाखतकार व इटालियन पत्रकार ओरिआना यांच्यावरील लेख वाचनीय आहे. वाचक, उदयोन्मुख मुलाखतकार आणि निवेदकांनी संग्रही ठेवावा, असा हा अंक आहे.
‘साहित्य सूची’, संपादक- योगेश नांदुरकर, पाने- १७८, किंमत- १०० रुपये

श्री दीपलक्ष्मी
भारतीय स्त्रीची कहाणी, चित्रकथा, ललित लेख, समृद्ध बालपण, कथा, इतिहास, समाजदर्शन, शहरनामा आणि हास्यचित्रे अशा विविध विषयांनी श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक सजलेला आहे.
गुरुनाथ तेंडुलकर यांची ‘मंगळसूत्र’ ही कथा वेश्यांची सद्य:स्थिती अचूकपणे मांडणारी आहे. डॉ. श्रीकांत मुंदरगी यांनी ‘दी साऊंड ऑफ म्युझिक’ या चित्रपटावर लिहिलेला लेख या चित्रपटाचा परिपूर्ण अभ्यास करणारा आहे. संजीव पाध्ये यांचा १९६५ च्या युद्धावर आधारित ‘न विसरता येणारं युद्ध’ आणि डॉ. धनंजय आचार्य यांनी लिहिलेला ‘शिवपुत्र संभाजी’ हा लेख वाचकांना इतिहासात डोकवायला लावणारा आहे. विजयराज बोधनकर यांनी ‘छत्रपती बनलो खेळांनी’ या लेखातून वेगवेगळ्या पारंपरिक खेळांची माहिती रंजक पद्धतीने मांडली आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, प्रभाकर दिघेवार, मनोहर, एस. ए. मुलानी आणि सुयोग चौधरी यांनी रेखाटलेली हास्यचित्रे अंकाची शोभा वाढविणारी आहेत.
संपादक- हेमंत रायकर, पृष्ठे- ३०४
किंमत- २५० रुपये

अक्षरभेट
जागतिकीकरणाच्या प्रवाहात अनेक सुख-सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी कौटुंबिक समस्याही निर्माण झाल्या आहेत. कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या या समस्यांचा मागोवा ‘अक्षरभेट’ या दिवाळी अंकातून नामवंत लेखकांनी घेतला आहे. फ. मु. शिंदे, चंद्रकुमार नलगे, डॉ. प्रतिमा इंगोले, अनुराधा गुरव, प्रा. वि. श. चौगुले आदी नामवंतानंी लिहिलेल्या कथा, व लेख कौटुंबिक समस्यांचा आढावा घेतात. या शिवाय शिरीष पै, नीला सत्यनारायण, सुरेश पाचकवडे आदीच्या कविता व व्यंगचित्रे यांचाही समावेश या अंकात आहे.
अक्षरभेट : संपादक : सुभाष सूर्यवंशी
पृष्ठे : २३२, किंमत : ९० रुपये.