ऊस आंदोलन आणि शिवसेनाप्रमुखांच्या निधनाने सर्वत्र बंद पाळण्यात आल्याने दिवाळी सुट्टीच्या पर्यटनावर परिणाम झाला. गोव्यात जाणारे पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात थांबत. त्यांची गैरसोय झाली असल्याचे बोलले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ऊस आंदोलन पेटल्याने रस्त्याने येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय झाली होती.
ऊस आंदोलनाचा भडका पाहून पर्यटक ठिकठिकाणी थांबले होते. नंतर ऊस आंदोलन तूर्त स्थगित ठेवल्याचे कळताच पर्यटकांची गर्दी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात झाली.
गोवा राज्यात जाताना किंवा परत येताना पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात थांबतात तसेच गोवा राज्यात निवासी सुविधा महाग पडत असल्याने पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात निवासाची सोय करून गोवा दर्शन घेतात असे चित्र गेली दोन वर्षे उभे राहिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातही आंबोली, तारकर्ली, सावंतवाडी, मालवण, विजयदुर्ग अशा पर्यटनस्थळावर हाऊसफुल्ल गर्दी या हंगामात आहे, पण ऊसदर आंदोलनामुळे गर्दी थोडी विस्कळीत झाली.
ऊसदर आंदोलन थांबताच शिवसेनाप्रमुखांच्या निधनाचे वृत्त येताच शनिवारी रात्रौपासून सर्वत्रच चलबिचल झाली.
त्यामुळे आज रविवारी गोव्यातून निघालेले पर्यटन रस्त्यामार्गे निघून गेले. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सर्वत्रच कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
जेवणासह झोपण्यासाठी सिंधुदुर्गात काही हॉटेल प्रसिद्ध आहेत, पण आज भोजन व्यवस्थाही बंद ठेवली गेल्याने पर्यटक थांबले नाहीत. मात्र गोव्यात आलेले पर्यटक मोठय़ा प्रमाणात परतले. सिंधुदुर्गात पाणी, चहा, जेवण आदी पर्यटकांना मिळणे अवघड बनले.