ध्वनीप्रदुषण होत असल्याने राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे वाजवण्यास मुंबई हायकोर्टाने बंदी घातली आहे. कोर्टाच्या या आदेशाचे राज्यभरातील गणेश मंडळांनी अतिशय गांभीर्याने पालन केल्याचे दिसून आले आहे. मुंबईसारख्या महानगरातही गणेश मंडळांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन केले. मात्र, सांस्कृतीक राजधानी म्हणून मिरवणाऱ्या पुण्यात कोर्टाच्या आदेशाला सपशेल केराची टोपली दाखवण्यात आली आहे. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर बहुतेक गणेश मंडळांनी डीजेचा दणदणाट सुरु केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाची कडक अमंलबजावणी केल्याचे चित्र होते. डीजे वाजणार नाहीत याची त्यांनी पुरेपूर खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे मुंबईसारख्या विशाल शहरात डीजेंऐवजी पारंपारिक ढोल-ताशांवर मिरवणूका निघाल्या. मात्र, मुंबई पोलिसांच्या तुलनेत पुणे पोलीस कमी पडल्याचे चित्र होते. कारण, पुणे पोलिसांनी बहुतांश डीजे वाजवणाऱ्यांवर मंडळांवर थेट कारवाई न करता केवळ पंचनामे करण्यावर भर दिला. पोलीस या मंडळांची नोंद करीत आहेत. अशा मंडळांवर गुन्हे दाखल होऊन उद्या त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

पुण्यामध्ये पाचव्या आणि सातव्या दिवशी डीजे वाजवणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर काल पुण्यात काही मंडळांनी एकत्र येऊन डीजे बंदीविरोधात पवित्रा घेत मिरवणुकीवर बहिष्कार घातला होता. मात्र, आज त्यांनी कोर्टाच्या आदेशांकडे सपशेल दुर्लक्ष करीत डीजे वाजवलेच. डेक्कन, कुमठेकर रस्ता, मंगळवार पेठ, दांडेकर पूल या भागात डीजे जोरात सुरु होते. श्री गुरुदत्त तरुण मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट शिवाजीनगर येथील मंडळाने टाळ वाजून आणि साऊंडवर भक्तगीत लावून कोर्टाच्या आदेशाचा निषेध नोंदवला. तर, विश्रामबाग मित्र मंडळाकडून डीजे बंदीविरोधात भोंगे आणि थाळ्या वाजून निषेध नोंदवला. मुंबईतल्या मंडळांमध्ये डीजे बंदीबाबत नाराजीचा सुर दिसून आलेला नाही. येथील गणेश मंडळांच्या समन्वय समितीने गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्यावर भर दिला.

दरम्यान, पुण्यातील एसपी कॉलेज परिसरात डीजे बंद करण्यावरुन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. तर खडकी भागात डीजे बंद करायला सांगितल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पोलिस नाईक थेटे यांना मारहाण करण्यात आली, या मारहाणीत कार्यकर्त्यांनी शेटे यांच्या डोक्यात काठीने प्रहार केल्याने ते रक्तबंबाळ होऊन जखमी झाले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dj free procession across the state in pune the order of the high court ceased
First published on: 23-09-2018 at 22:18 IST