ध्वनीप्रदुषण होत असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे वाजवण्यास मुंबई हायकोर्टाने बंदी घातली आहे. मात्र, नाशिकमध्ये आमदार बाळासाहेब सानप यांनी कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. सानपांच्या तपोवन मित्र मंडळाच्या गणपती मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सुरु असून यात त्यांचे पुत्र नगरसेवक मच्छिंद्र सानपही थिरकले आहेत. सुत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

आमदार बाळासाहेब सानप हे मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचे मानले जातात. दरम्यान, नाशिकमध्ये मुख्य मिरवणूक मार्गावर २१ गणेश मंडळे दाखल झाली असून मिरवणूक सुरुळीत सुरु आहे. यात काही गणेश मंडळांनी कोर्टाचे आदेश धुडकावत डीजे वाजवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, राज्यभरात गणेश मंडळांनी कोर्टाच्या डीजे बंदीच्या आदेशाचे पालन केल्याचे चित्र असून पुण्यात मात्र या आदेशाला हरताळ फासण्यात आली. पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील बहुतेक मंडळांनी रात्री सात वाजल्यानंतर डीजे वाजवण्यात सुरुवात केली. डीजे वाजवणाऱ्या मंडळांची नोंद पोलीस करीत आहेत. त्यानंतर उद्या या मंडळांवर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात.