बहुचर्चित श्रुती भागवत खून प्रकरणाचा तपास लावण्यात अयशस्वी ठरलेल्या औरंगाबाद पोलिसांनी डीएनए फिंगर प्रिंट चाचणी घेतली असून त्याचे अहवाल पुढच्या आठवडय़ात येतील. त्यानंतर तपासाला गती येईल, असे भागवत यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी सांगितले.
या चाचणीसाठी आवश्यक ते नमुने पूर्वी दिल्ली येथे पाठविण्यात आले होते. तथापि, तेथील यंत्रे सदोष असल्याने नमुने पुन्हा एकदा हैदराबादला पाठविण्यात आले. या आठवडय़ात त्याचे अहवाल हाती येतील आणि त्यानंतर तपासाला वेग येईल, असे सांगितले जाते. श्रुती भागवत यांचे बंधू मुकुल यांनी भागवत खून प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा अन्य तपास यंत्रणांकडे वर्ग करावा, अशी विनंती केली होती. मात्र, ती पोलीस आयुक्तांनी फेटाळली. या प्रकरणात तपास करत असणारे सायबर क्राईम विभागाचे प्रमुख गौतम पतारे म्हणाले की, तेथून अहवाल पाठविण्यात आला आहे. अद्याप तो हाती आला नाही. त्यात काय म्हटले आहे यावर पुढील तपासाची दिशा ठरवू. १८ एप्रिल २०१२ रोजी उल्कानगरी येथे श्रुती भागवत या विवाहित स्त्रीचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. खून करून मृतदेह विवस्त्र अवस्थेत जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. या प्रकरणात तपास करूनही पोलिसांना यश मिळाले नाही. तत्कालिन पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. नव्या अहवालाने तपासास गती येईल, असा दावा केला जात आहे.