प्रसिद्ध साहित्यिक फादर फ्रान्सीस दिब्रेटो आणि अध्यात्माचे अभ्यासक, कीर्तनकार मारोती महाराज कुऱ्हेकर यांना अनुक्रमे २०१३-१४ आणि २०१४-१५ या वर्षासाठीचे ‘ज्ञानोबा तुकाराम’ पुरस्कार राज्य शासनाने सोमवारी जाहीर केले.
संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱया किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाया महनीय व्यक्तीला ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.
पाच लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुस्काराचे स्वरुप असून, हा पुरस्कार या यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. यु. म. पठाण व प्रा. रामदास डांगे यांना प्रदान करण्यात आला आहे.
विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सय्यद भाई, भास्करराव आव्हाड, चैतन्य महाराज देगलूरकर, डॉ.प्रशांत सुरु, सिसिलिया कर्व्हालो आणि गुरुप्रसाद पाखमोडे हे सदस्य असलेल्या समितीने दिब्रेटो आणि कुऱ्हेकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 27, 2015 2:41 am