‘कोणी कोणाचे पाणी पळविलेले नाही, रामराजेंनी पाण्याबाबत कधीही राजकारण केलेले नाही. मात्र, आमचे स्वयंघोषित छत्रपती खासदार उदयनराजे भोसले काही चक्रमांना घेऊन भलते सलते आरोप करीत आहेत त्यांना आवरा नाहीतर पक्षातून बाहेर पडू,’ असा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला आज फलटण येथे दिला.

नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून राजकारण जोरदार तापलेले असताना उदयनराजे भोसले यांनी १४ वर्षे बारामती-इंदापूरला ज्यादा पाणी देण्यावरून रामराजे नाईक निबाळकरांवर जोरदार टीका केली होती. त्याला उत्तर देताना रामराजेंनीही कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली. कोणीही कोणाचे पाणी पळविलेले नाही जर पाणी पळविले असेल तर त्याला एकटे रामराजेच जबाबदार कसे? विजयदादा पण त्यावेळी कालवा समितीत होते. त्यावेळी त्यांनी याला विरोध कसा दर्शवला नाही, असा सवालही निंबाळकर यांनी केला आहे.

पाण्याच्या विषयावरून इतर रज्यात लोक एकत्र येत असताना आमच्याकडे पाण्यासाठी कुरघोड्या करायचे काम सुरू आहे. जलसंपदा मंत्र्यांनी डाव्या कालव्यातील पाणी बंद करायचा आदेश दिला आहे. त्यामुळे फलटण, माळशीरस संघोला आदी लाभ क्षेत्रातील दोन लाख कुटुंबे पाण्यापासून वंचित होतील तर फलटण शहर व आकलूजला पिण्याच्या पाण्यातही कपात होईल. १७ तारखेनंतर याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून आकडेवारी त्यांच्या समोर मांडणार आहे. २००७ च्या लवादानुसार पाणी वाटप झाल्यानंतर तत्कालीन शासनाने कृष्णा खोर्‍यातील पाणी अडविण्यासंबंधी घेतलेली भूमिका तसेच मी जलसंपदामंत्री होतो तेंव्हा केलेल्या प्रयत्नामुळे विविध धरणात पाणी दिसत असल्याचा निर्वाळा रामराजेंनी दिला.

रामराजे म्हणाले, निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पात असलेले पाणी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात देण्यात येणार होते पण कालव्यांची कामे न झाल्याने व निरा उजवा कालव्याची वहन क्षमता लक्षात घेऊन निरा देवघरचे पाणी उजव्या व डाव्या कालव्यात सोडावे असे असताना पाणी उजव्या कालव्यात बसणे अवघड होते म्हणून डाव्या कालव्यात सोडले हे काही असले तरी तालुक्यातील ऊसाचे क्षेत्र ६५ हजार हेक्टर वरुन ४ लाख हेक्टरवर पोहोचले ही बाब शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहेच. तथापी निरा देवघर प्रकल्पात पाणी अडविल्यानंतर आपण तत्कालीन मुख्यमंत्री प्रुथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी दिल्लीतून पैसे मिळवा अशी भूमिका मी मांडली होती, पण त्यांना ते शक्य झाले नाही.

मात्र, तरीही चक्रम दोन खासदार आणि एक आमदार उलट सुलट बोलून कोणतीही माहिती न घेता आरोप करीत आहेत. त्या आरोपांना उत्तर द्यायला आपण खंबीर आहोत. पुनर्वसनातील जमिनी आम्ही खरेदी केल्या असतील तर त्या सिद्ध करा आम्ही तुमचं सगळं काढतो, असा इशाराही त्यांनी थेट उदयनराजेंना दिला. त्यावेळी शरद पवारांनी बैठक बोलवलीच आहे त्यात त्यांना आवरा नाहीतर आम्हाला दरवाजे उघडे आहेत असा इशाराही यावेळी रामराजेंनी दिला.