18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

आतातरी कोणी नक्षलवादी बनू नका

ऐन तारूण्यात मारल्या गेलेल्या माझ्या मुलाची अवस्था बघा व आता तरी नक्षलवादी बनू नका

देवेंद्र गावंडे, चंद्रपूर | Updated: January 26, 2013 2:09 AM

ऐन तारूण्यात मारल्या गेलेल्या माझ्या मुलाची अवस्था बघा व आता तरी नक्षलवादी बनू नका हे हताश पण आवाहनवजा उद्गार आहेत शनिवारच्या चकमकीत ठार झालेला जहाल नक्षलवादी शंकरचे वडील जक्तू लकडाचे. आपल्या मुलाचा मृतदेह घेण्यासाठी गडचिरोलीत आलेल्या जक्तूने माध्यमांशी बोलताना आता म्हातारवयात मुलाच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ माझ्य़ावर आली आहे, असे म्हणत मनातल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली आणि गडचिरोलीत सुरू असलेल्या युद्धातील एक वेगळा पैलू समोर आला.
 गेल्या शनिवारी अहेरी तालुक्यात गोविंदगावजवळ पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले होते. या सर्वाचे मृतदेह सध्या गडचिरोलीच्या सामान्य रूग्णालयात ठेवले आहेत. मृतदेह घेऊन जाण्याविषयी पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जक्तू लकडा  नातेवाईकांसह गडचिरोलीत आले. त्यावेळी त्यांनी या चकमकीत ठार झालेल्या आपल्या मुलाची संपूर्ण कहाणीच कथन केली. एटापल्ली तालुक्यात अगदी छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या रमणटोलात राहणाऱ्या जक्तू लकडांचा मुनेश्वर उर्फ शंकर हा सर्वात मोठा मुलगा. ७ वी पर्यंत शिकलेला शंकर १३ वर्षांपूर्वी जहाल नक्षलवादी जोगन्नाच्या नादी लागून चळवळीत जायला निघाला तेव्हा आम्ही त्याला खूप विरोध केला. मी व माझी पत्नी पालेने त्याला परोपरीने समजावले. तेव्हा केवळ १५ दिवसापूर्वी त्याचे लग्न झाले होते. तरीही पत्नीला सोडून तो निघून गेला. नंतर एक वर्षांने संपूर्ण दलमसकट तो भेटायला आला. तेव्हा त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. तेव्हाही त्याची सर्व नक्षलवाद्यांच्या समक्ष समजूत काढली. या चळवळीत जाऊन काही भले होणार नाही, त्यापेक्षा घरच्या पाच एकर शेतीत राब असा सल्ला त्याला दिला. पण तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता.
त्याच्या जाण्याने पत्नीने थेट अंथरूण धरले. दोन वर्षांतच तिचा मृत्यू झाला. मुलगा नक्षलवादी झाला म्हणून दोन्ही राज्यांच्या पोलिसांची नजर माझ्य़ावर खिळली. तीन वर्षांपूर्वी छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवाद्यांना जेवण दिल्याच्या आरोपावरून मला कांकेरच्या तुरूंगात टाकले. तिथे दीड वर्ष राहिल्यानंतर कशीबशी सुटका झाली. मधल्या काळात मुनेश्वरची काही खबर नव्हती. त्याने चळवळीत लग्न केल्याचे कळले होते. आता थेट त्याच्या मृत्यूचीच बातमी कळली असे जक्तू म्हणाला. तरूण वयातील मुलगा जाण्याएवढे दुसरे दु:ख कोणते नाही. माझ्य़ावर ही वेळ या चळवळीने आणली. त्यामुळे आता तरी कुणी नक्षलवादी बनू नका, असे जक्तूने साश्रू नयनाने सांगितले.
गडचिरोलीच्या शवागारात ठेवलेल्या सहा पैकी चार नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी नेलेले आहेत. मृतदेह घेण्यासाठी येणाऱ्या या नातेवाईकांजवळ साधे भाडय़ाचे पैसेही नाहीत. ही बाब लक्षात आल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी मानवीय दृष्टीकोन बाळगत या नातेवाईकांना पैशाची व्यवस्था करून दिली. मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहने भाडय़ाने करण्याची या नातेवाईकांची ऐपत नव्हती. तेव्हाही पोलिसांनीच त्यांना वाहने उपलब्ध करून दिली. आतापर्यंत शंकर, विनोद कोडापे, झुरू व गीता यांचे मृतदेह नातेवाईकांनी नेलेले आहेत. आणखी दोघांचे मृतदेह अजून शवागारातच पडून आहेत. त्यांच्या नातेवाईकांशीही  संपर्क झालेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शनिवारी गोविंदगावजवळ झालेली चकमक बनावट होती. पोलिसांनी प्रतिकाराची संधी न देता आमच्या सहकाऱ्यांना ठार केले असा आरोप दक्षिण गडचिरोलीचा विभागीय सचिव भास्करने एका पत्रकातून केला आहे. भास्करने एटापल्लीतील पत्रकारांकडे दोन पत्रके पाठवली असून त्यात पोलिसांच्या कारवाईचा बदला घेतला जाईल असा इशारा दिला आहे. याशिवाय दुसऱ्या पत्रकात नुकतेच आत्मसमर्पण केलेला नक्षलवादी शेखरला गद्दार संबोधण्यात आले आहे.

First Published on January 26, 2013 2:09 am

Web Title: do not become naxal now
टॅग Naxal,Naxalite