लोकसभेच्या निवडणूक निकालाची चर्चा आता पुरे झाली. तो निकाल कसा लागला कुणी लावला यावर आता काहीही चर्चा नको. आता समोर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश कसे मिळेल याकडे लक्ष द्या असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ईव्हीएमला दोष देत आपल्या कामाकडे दुर्लक्ष करु नका असे आवाहन विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केले. आज जल संकल्प दिन साजरा करत आहोत. पाण्याची टंचाई निर्माण झाल्यावर आपल्याला महत्त्व कळतं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.राष्ट्रवादीच्या २० व्या स्थापना दिन मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

दरम्यान एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सातत्याने ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार मात्र ईव्हीएमला दोष देत आपल्या कामांकडे दुर्लक्ष करू नका असे म्हणत आहेत त्यामुळे ईव्हीएमच्या मुद्द्यावरून या दोघांमधले मतभेद समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व असून ते स्वतंत्रच राहणार आहे.आपला पक्ष कुठेही आणि कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही. त्या उठलेल्या वावड्या होत्या असे सांगतानाच जातीयवादी पक्षांना थांबवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वतः च्या मंत्र्यांच्या चुका झाकण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत असाही टोला यावेळी अजित पवार यांनी लगावला. सध्याच्या घडीला लोकांना जागृत करण्याची गरज आहे असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले. आघाडी पुन्हा राज्यात सत्तेत कशी येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. बेरोजगारी वाढली आहे. कंपन्या बंद होत आहेत, युवकांना नोकरीसाठी वणवण करावी लागत आहे. समाजातला कुठलाही घटक समाधानी नाही. अनेक जागा रिक्त आहेत. जेवढ्या जागा रिक्त आहेत त्या सर्व ठराविक काळात भरल्या जातील असे आश्वासन देतानाच लोकांचा विश्वास संपादन करण्याचे कामही आपल्याला करायचे आहे असेही अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.