धवल कुलकर्णी

करोनामुळे सुरु असलेल्या टाळेबंदीत अर्थचक्र व उत्पादन थांबल्याचे कारण देत खासगी कंपन्या व आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार कापण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला हरताळ फासून अनेक ठिकाणी एप्रिल महिन्याचे पगार द्यायला मालक मंडळी नाखूष आहेत. मात्र आतापर्यंत या उद्योगपतींनी व भांडवलदारांनी कामगारांच्या जोरावर भरपूर संपत्ती कमावली असून या गोष्टीचे भान ठेवत त्यांनी कामगारांना व कष्टकऱ्यांना वेतन द्यावे व तसे न केल्यास सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय मजदूर संघाने केली आहे.

“मार्च एप्रिल महिन्याचे वेतन कामगारांना मिळालेच पाहिजे. सध्या उद्योग जरी बंद असले तरी सुद्धा इतकी वर्ष याच कामगारांच्या जिवावरती मालक मंडळींनी भरपूर पैसा कमावला आहे. मार्च महिन्याच्या बहुतेक दिवसांमध्ये कामगारांनी काम केले आहे आणि प्रश्न फक्त एप्रिल महिन्याचा आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता एक महिन्याचा पगार द्यायला काय अडचण आहे? जर उद्योगांनी कामगारांना पगार देण्यास नकार दिला तर सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी. सरकारने जे शक्य होईल ते करावं पण मजुरांना त्यांचे पगार दिला जातोय याची खबरदारी घ्यावी,” अशी मागणी भारतीय मजदूर संघाचे उत्तर मध्य विभागाचे संघटन मंत्री पवन कुमार यांनी केली.

लोकसत्ता डॉट कॉम शी बोलताना कुमार म्हणाले “उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये काही आस्थापनांनी पगार देण्यास टाळाटाळ केल्याच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही सरकारी यंत्रणेकडे तक्रार केली आणि त्यानंतर तिथल्या अतिरिक्त जिल्हा न्यायदंडअधिकाऱ्यांनी संबंधितांना बोलून तीन दिवसांमध्ये पगार करा अन्यथा कारवाई करण्यात येईल” अशी सक्त ताकीद दिली.

त्याचबरोबर कुमार यांनी मागणी केली की सरकारने काही अशा उद्योगांवर आणि क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे ज्यांची पूर्ण नोंद सरकार दरबारी नाही जसे की रस्त्यावरचे ठेले वाले, मत्स्य पालन करणारे, पोल्ट्री उद्योजक, सायकल रिक्षा, रिक्षा व टॅक्सी चालक. भारतीय मजदूर संघाने अशी मागणी केली आहे की लोक डाऊन संपल्यानंतर उद्योग हे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावेत आणि त्यांच्यामध्ये शारीरिक अंतरा सह सर्व खबरदारी घेण्यात यावी.

त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांकडून स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यात येणाऱ्या शेतमालावर तिथेच प्रक्रिया करून त्यांना उत्तम भाव मिळवून द्यावा. उदाहरणार्थ भारतीय मजदूर संघाने हरियाणातील पंचकूला मध्ये उत्पादित करण्यात येणाऱ्या आल्यावर अशीच प्रक्रिया केली. असेच काम उत्तर प्रदेशातल्या आजमगड मध्ये उगवण्यात येणाऱ्या लाल मिरचीचे लोणचे करून करण्यात आले.