ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांनी आम्हाला सूडाच्या मार्गाने जाण्यास भाग पाडू नये असं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी सत्ता ही कायम राहत नाही याचं भान ठेवावं असंही भाजपाचा थेट उल्लेख न करता म्हटलं आहे.

सरकारवर दबाव आणण्यासाठी ईडी सारख्या संस्थांच्या मदतीने महाविकास आघाडीच्या आमदारांवर धाडी घालून दहशत आणि दडपशाही करत आहेत. आमदारांनी गुडघे टेकावेत यासाठी हे सारं केलं जात आहे. याकडे तुम्ही कसं पाहता, असा प्रश्न राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय यंत्रणांच्या आडून राज्यातील सरकारला जो विरोध केला जात आहे या विरोधाचा सरकारच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र योग्य पद्धतीने सामना करेल असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला आहे. “सरकार काय संपूर्ण महाराष्ट्र याचा सामना करेल. महाराष्ट्रात सूडाचा विचार कधीच रुझलेला नाही. शत्रूला पराभूत करणं आहे पण या पद्धतीने कधी घडलं नव्हतं. ममता बॅनर्जींनी अशाप्रकारे संघर्ष केला. तो त्या करणारच कारण बंगाल आणि महाराष्ट्राला क्रांतीकारी परंपरा आहे. क्रांती आणि पराक्रम या मातीत जन्माला येतो. म्हणूनच महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो. केवळ अन्याय नाही तर अंगावर येणाऱ्या उपऱ्यांचा फडशा कशा पाडायचा ती शक्ती आणि प्रेरणा आपल्याला दिली आहे,” असं उद्धव यांनी म्हटलं आहे.

सत्ता कायम एकाकडे राहत नाही अशी आठवणही उद्धव ठाकरेंनी भाजपाला करुन दिली आहे. “राजकारण राजकारणासारखं करा. सत्तेचा दुरुपयोग करुन अंगावर येणार असाल तर लक्षात ठेवा सता सदासर्वकाळ कोणाकडे राहत नाही. मागे त्यांच्याविरोधात कसं काय चाललं होतं. त्यावर कोणत्या आणि कशा केसेस होत्या हे ठाऊक आहे. त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी त्यांना कसं वाचवलं होतं याचं थोडं जरी भान असेल तर काळ कसा बदलू शकतो हे समजेल. जनता ही सर्वोच्च सत्ता आहे आणि ती आमच्या बाजूने आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा- “कुटुंबावर किंवा मुला-बाळांवर येणार असाल तर…”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

ईडी किंवा सीबीआयचा वापर विरोधकांकडून केला जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना उद्धव यांनी या संस्थांवर केंद्राचा अधिकार नाही का असा प्रश्न उपस्थित केला. “सीबीआय काय ईडी काय त्याच्यावर राज्यांचा अधिकार नाही का? आम्ही देतो ना नावं. मालमसाला संपूर्ण तयार आहे पण सूडाने जायचं का? सूडानेच वागायचं असेल तर मग तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढतो,” असा सूचक इशारा विरोधकांना दिला.

आणखी वाचा- “भाजपाच्या राजकीय जिहादचं काय?”

याचवरुन राऊत यांनी, “तुमच्याकडच्या मसाल्याला फोडणी कधी देणार?”, असा प्रश्न विचारला असता उद्धव यांनी सूडाच्या मार्गाने जाण्यास आम्हाला कोणी भाग पाडू नये असं म्हटलं आहे. “सूडाने वागायचं आहे का तसं थेट सांगावं. माझं विरोधकांना एकचं म्हणणं आहे, हे असे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करु नका. विकृती ही विकृती असते अन् त्या मार्गेने जाण्याची आमची इच्छा नाही. त्यामुळे त्या मार्गेने जाण्यास आम्हाला भाग पाडू नका,” असं उद्धव यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना, “सूडचक्रामध्ये जाण्याची आमची इच्छा नाहीय. तुमच्याकडे सूडचक्र असेल तर आमच्याकडे सूदर्शनचक्र आहे. आम्हीही ते तुमच्या मागे लावू शकतो,” असा सूचक इशारा उद्धव यांनी विरोधकांना दिला आहे.