केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा अधूनमधून होत असते. पण आज राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांनी या विषयाला थेट हात घातला. राजकारणात त्यांचा टिकाव लागणार नाही, असे भाकीतही वर्तविले.
रयत संकुलाच्या वतीने बोरावके महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर जयंती सोहळय़ात िनबाळकर यांनी डॉ. जाधव यांना धोक्याची जाणीव करून दिली. डॉ. जाधव हे लोकसभेची शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवणार अशी चर्चा अधूनमधून होत असते. पण त्याचा स्पष्ट खुलासा त्यांनी कधी केला नाही. िनबाळकर यांच्या वक्तव्यानंतरही त्यांनी मौन बाळगले. सोहळय़ात डॉ. जाधव, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब िशदे हे होते.
िनबाळकर म्हणाले, डॉ. जाधव हे सक्रिय राजकारणात येणार आहेत. पण उच्चशिक्षित लोक नेहमी हस्तिदंती मनो-यात राहतात. त्यामुळे आज ज्याप्रकारे राजकारण केले जाते, त्या राजकारणात अशा चांगल्या माणसाचा टिकाव लागणे मुश्कील असल्याचे ते म्हणाले. डॉ. जाधव यांच्या शैक्षणिक धोरणाचाही त्यांनी समाचार घेतला. चांगल्या प्रयोगशाळा, शिक्षकांचे प्रशिक्षण यात त्यांनी योगदान देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा निंबाळकर यांनी व्यक्त केली.
डॉ. कदम यांनी निंबाळकर यांचा कृष्णा खो-याचा अभ्यास असल्याचे सांगितले होते. त्याचा समाचार घेताना िनबाळकर म्हणाले, मी तोंडी बोलत नाही, कागदावर खेळतो. मंत्रिमंडळात असताना कमी बोलायचो अन् बोलण्याची जबाबदारी पतंगराव कदम यांच्यावर टाकायचो. ते बोलतात आणि बरोबर करतात. त्यांनी आमचे पाणी पळविले आहे. त्यामुळे त्यांनी आमचे ऐकले पाहिजे. असा टोमणाही िनबाळकर यांनी कदम यांना मारला. तिघाही पुरस्कारार्थीचे त्यांनी कौतुक केले.
डॉ. जाधव यांनी सांगितले, की नियोजन मंडळाने शिक्षण व कौशल्य विकासावर अधिक जोर दिलेला आहे. देशाचे सरासरी वय २४ वर्षे असून भारत हा जगात सर्वात तरुण वयाचा देश आहे. त्याचा फायदा करून घेतला नाही तर आपण करंटे ठरू, त्याकरिता शिक्षण व कौशल्य विकासाला प्राधान्य दिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पवार यांनी मंदिरात दान टाकण्याऐवजी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दान द्यावे, कुठलेही सामाजिक काम करताना स्वत:चा व्यवसाय हाताशी असला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक डॉ. शंकरराव गागरे, स्वागत डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सूत्रसंचालन भास्कर निफाडे, सुशीला हिरगळ यांनी केले. या वेळी िशदे, अरुण कडू यांची भाषणे झाली. आभार प्राचार्य लक्ष्मण भोर यांनी मानले. या वेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम, मीनाताई जगधने, एकनाथ घोगरे, सुमनभाई शहा, विजय बनकर, माणिकराव जगधने आदी उपस्थित होते.