‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्थरातून टीका होत आहे. अशामध्ये त्यांच्या विरोधात आणि समर्थनार्थ दोन गट पडल्याचे दिसून येत आहेत. बीड आणि पिंपरीमध्ये नुकतीच इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. सोशल मीडियावर या दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली आहे.

इंदुरीकर महाराजांचे समर्थक मोर्चे आणि आंदोलनाच्या तयारीत आहेत. सोशल मीडियावर तशी चर्चाही आहे. चलो अहमदनगर असा नारा समर्थकाकडून लगावला जात आहे. पण इंदुरीकर महाराजांनी आपल्या समर्थकांना असं काहीही करू नका अशी विनंती केली आहे. जे काय आहे ते कायद्याने सिद्ध होईल असंही ते म्हणाले आहेत. इंदुरीकर महाराजांनी चाहत्यांना विनंती करणारं एक पत्रक जारी केलं आहे.

काय म्हटलेय पत्रकात?
आपण कोणीही, कोठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, निवेदन देण्याचा प्रयत्न करू नये. आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहे. तरी सर्वानी शांतता राखून सहकार्य करावं, अशी विनंती.

चाहत्यांमध्ये नाराजी का?
इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वाद निर्माण झाला अन् त्यांच्यावर टीकेची झोड उडाली. यावरून समर्थक आणि विरोधक यांच्यात वाद सुरु होता. त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचे कीर्तन रद्द झाले तर अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. या सर्वांना कंटाळून इंदुरीकर महाराजांनी किर्तन सोडून शेती करणार असल्याचा पवित्रा घेतला. त्यांच्या या पवित्र्यामुळं चाहत्यांमध्ये नाराजी पसरली असून इंदुरीकरांच्या समर्थनाची मोहीमच सुरू झाली आहे. त्यासाठी चलो नगर अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.