23 April 2019

News Flash

क्रांतिदिनापर्यंत लिंगायत धर्माला मान्यता न मिळाल्यास ‘करो वा मरो’ आंदोलन

विभागीय आयुक्तालयावरील मोर्चाचा इशारा

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

विभागीय आयुक्तालयावरील मोर्चाचा इशारा

लिंगायत धर्मास शासन मान्यता मिळावी आणि आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी २०१४ पासून सातत्याने पाठपुरावा आणि आंदोलन करूनही यश मिळालेले नाही. ९ ऑगस्ट या क्रांतिदिनापर्यंत मागण्या मान्य न झाल्यास लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने करो वा मरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीचे नेते ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिला आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समितीच्या वतीने रविवारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर नाशिक विभागीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोयटे यांनी भूमिका मांडली.

नाशिकरोड येथील शिखरेवाडीपासून महसूल आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात नाशिकसह धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार जिल्ह्य़ातून आलेले हजारो नागरिक सामील झाले होते. मोर्चेकऱ्यांकडून ‘भारत देश जी बसवेशा..लिंगायत धर्म, स्वतंत्र धर्म’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. पेठ, नाशिकरोड, कोपरगाव येथील समाज बांधवांनी लिंगायत धर्माचा प्रचार करणारे चित्ररथ तयार केले होते. विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लिंगायत धर्मातील सर्व पोटजातींना तसेच शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ‘हिंदू-लिंगायत’ असा उल्लेख असलेल्यांना इतर मागास वर्गाचे दाखले मिळावेत, लिंगायतमधील जंगम प्रवर्गास मागासवर्गीय म्हणून तसेच गवळी प्रवर्गास भटक्या विमुक्त जाती जमातीचे दाखले तातडीने देण्याच्या सूचना शासकीय अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशा मागण्यांचा समावेश आहे. कोल्हापूर येथे महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर क्रांतिदिनापासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. तसेच १५ ऑगस्ट रोजी तिरंग्यासह लिंगायत धर्माचा ध्वज फडकाविण्यात येणार असल्याची घोषणाही संघर्ष समितीने केली आहे. मोर्चाचे नेतृत्व काका कोयटे यांच्यासह नाशिकचे चंद्रशेखर दंदणे, अनिल चौघुले, वसंतराव नगरकर, अ‍ॅड. अरुण आवटे, दुर्गेश भुसारे आदींनी केले.

First Published on April 30, 2018 1:14 am

Web Title: do or die movement in nashik