मराठवाडय़ाचे नेतृत्व विकसित होऊ नये, म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी जाणीवपूर्वक मराठवाडय़ाच्या नेतृत्वाचे खच्चीकरण केले. मराठवाडय़ातून उदयास येणाऱ्या नेतृत्वाला संपविण्याचे कारस्थान पश्चिम महाराष्ट्राने आजवर केले. स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय मराठवाडय़ाचे प्रश्न सुटणार नाहीत व मराठवाडय़ाचे मागासलेपणही दूर होणार नाही. त्यासाठी मराठवाडय़ाच्या जनतेने संघटित होऊन आवाज उठवावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व स्वतंत्र मराठवाडा संघर्ष कृती समितीचे निमंत्रक विजय वरपूडकर यांनी व्यक्त केली. भविष्यात आंदोलनाचा कृती कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल, असेही ते म्हणाले.
वरपूडकर यांच्या निवासस्थानी या संदर्भात पत्रकार बैठक झाली. ताडकळस बाजार समिती सभापती रंगनाथराव भोसले, नगरसेवक सचिन देशमुख, डॉ. श्रीराम मसलेकर, नितीन वट्टमवार आदी या वेळी उपस्थित होते. मराठवाडय़ाला हक्काचे पाणी मिळत नाही. सर्वाधिक भारनियमन होत आहे. मराठवाडय़ाचा हजारो कोटींचा अनुशेष कायम आहे, आदी प्रश्नी राज्यकर्त्यांकडून उपेक्षा सुरू आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र मराठवाडा झाला पाहिजे. या साठी जनजागृती करण्यात येणार आहे. या मागणीला जनतेसह मराठवाडा विभागातील आमदार सहकार्य करतील, अशी अपेक्षा वरपूडकर यांनी व्यक्त केली.
स्वतंत्र मराठवाडय़ासाठी श्रम, घाम व रक्त सांडले तरी चालेल. परंतु हा लढा निकराने पुढे घेऊन जाऊ, असा निर्धार वरपूडकर यांनी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी मराठवाडय़ातील बाळासाहेब पवार, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर या नेतृत्वाचे खच्चीकरण केले. विलासराव देशमुख यांना उचलून दिल्लीला नेले, तर अशोक चव्हाणांना उचलून घरी बसवले, या बाबींचा मराठवाडय़ातील जनतेने गांभीर्याने विचार करावा, असेही ते म्हणाले. मराठवाडय़ाच्या हक्काच्या मागण्यांसाठी भविष्यात मोठे आंदोलन उभारले जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात या विषयावर जाणीवजागृती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.