आघाडी सरकारने समाजाच्या भल्यासाठी खूप काम केलं आहे तर विरोधकांनी सर्व कामांचं फक्त राजकारण करत जबाबदारी झटकल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उदयनराजे भोसलेंच्या सभेत खंडाळा येथे केला.
     सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले  यांच्या प्रचारसभेत अजित पवार बोलत होते. या वेळी रामराजे निंबाळकर पालकमंत्री शशिकांत िशदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, सुभाष शिदे, सुनील काटकर आदी उपस्थित होते.
    विरोधकांनी सर्व समस्यांचं राजकारण केले तर आघाडी सरकारने राज्यात व देशात खूप काम केले आहे. विरोधक फक्त निवडणुका आल्या की, सरकारने काही केलं नाही असे सांगतात आणि निवडणुका झाल्या की सर्व विसरून जातात. सरकारवर फक्त आरोप करत सुटायचे आणि सर्व प्रश्नांतून जबाबदारी झटकून नामानिराळे व्हायचे अशी नीती विरोधकांनी राज्यात राबविली.  
विरोधकांनी आरोप केलेला चितळे समितीचा अहवाल सरकारकडे आला आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करून हा अहवाल वेबसाईटवर सर्वासाठी खुला करण्यास सांगणार आहे. राज्यात सरकारने पाचसहा मेडीकल कॉलेज करण्याचा निर्णय घेतला, त्यात साताऱ्यालाही प्रधान्य देण्यात आले आहे. पुणे, कोल्हापूर महामार्गाचे सहापदरीकरण करण्यात येत आहे तसेच खंबाटकी घाटात आणखी एक बोगदा करण्यात येणार आहे. सातारा जिल्हय़ात पर्यटन  व तीर्थक्षेत्र विकास, अजिंक्यतारा किल्ल्याचे संवर्धन करून त्यांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. कास धरणाची उंची वाढविण्यात येणार असून, महाबळेश्वर, पाचगणी येथे पर्यटन विकासाच्या आणखी संधी अपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कऱ्हाड पाटणसाठी मुख्यमंत्र्यांच्या विचारविनीमयातून एक वेगळा आराखडा तयार करण्यात आला आहे. या भागात वाढत असणाऱ्या कारखानदारीला कुशल कामगार वर्ग उपलब्ध करून देण्याची गरज आहे. स्थानिकांना रोजगारात प्रधान्य देण्यात येऊन कारखानदारांना आता माण, खटाव येथेही उद्योगधंदे उभारण्यास प्रधान्य देण्यात येणार असल्याचे सांगत, मला जिल्हय़ातील सर्वच प्रश्नांची माहिती आहे.  खासदार उदयनराजे भोसले यांनीही यापुढेही सर्व आमदारांना बरोबर घेऊन जिल्हय़ाचा विकास करावा हे सांगायला अजित पवार विसरले नाहीत. या सभेत रामराजे निंबाळकर, उदयनराजे भोसले पालकमंत्री शशिकांत शिदे,आमदार मकरंद पाटील आदींची भाषणे झाली.