राज ठाकरे म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते त्यांचे तडफदार आणि आक्रमक नेतृत्त्व. मात्र या आक्रमक नेत्याने आपण कुणाला घाबरतो हे आता सांगितले आहे. राज ठाकरे कुणाला घाबरत असतील असे एकूण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून वाटत नाही. मात्र त्यांनीच या संदर्भातली कबुली दिली आहे.कुस्तीच्या आखाड्यातील पैलवानांची आपल्याला भीती वाटते अशी कबुली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

पुण्यातील ओतूरमध्ये राज ठाकरे माजी आमदार कै. श्रीकृष्ण तांबे कुस्ती आखाड्याचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी तुमच्या हस्ते कुस्ती लावणार आहोत असे त्यांना सांगण्यात आले. ज्यानंतर लगेचच ”माझ्या हातून कुस्ती लावायची म्हणजे काय करायचे? असा प्रश्न त्यांनी विचारला तसेच मी कुस्ती लावायला आलो आहे, लढायला नाही तेव्हा जरा सबुरीने घ्या अशी विनंती आखाड्यातल्या पैलवानांना राज ठाकरेंनी केली. नाहीतर सगळे मिळून मलाच रिंगणात घ्याल आणि लंगोटीवर घरी पाठवाल, घरी गेल्यावर बायकोने पाहिले तर विचारेल हे घरात कोण आलं आहे?” असं राज ठाकरेंनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी राज ठाकरे यांनी आपण पैलवानांची भीती वाटते अशी अशी प्रांजळ कबुलीच दिली.

राज ठाकरे हे कायम त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि त्यांच्या खुमासदार फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. राज ठाकरे हे एक उत्तम व्यंगचित्रकारही आहेत. त्यामुळेच त्यांच्या भाषणात ते असा एखादा मुद्दा जरूर शोधून काढतात जो मार्मिक भाष्य करणारा असतो. आज राज ठाकरेंच्या खुमासदार भाषणाचा अनुभव ओतूरकरांनीही घेतला. भाषणात त्यांच्या वाक्यावाक्याला टाळ्या पडत होत्या आणि एकच हशा पिकत होता. त्यांच्या या भाषणामुळे कै. श्रीकृष्ण तांबे कुस्ती आखाड्याच्या उद्घाटन सोहळ्याला रंगत आली.