भगवान गड या ठिकाणी १२ डिसेंबरचं म्हणजेच गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचं औचित्य साधत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी शक्तीप्रदर्शन केलं. मी आता महाराष्ट्रासाठी काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. एवढंच नाही तर मला कोअर कमिटीतूनही रजा द्या असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र त्यांच्या या सगळ्या शक्तीप्रदर्शनावर धनंजय मुंडे यांनी टोला लगावला आहे. “पेल्यातलं वादळ पेल्यातच शमणार” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेना टोला लगावला.

पंकजा मुंडे यांनी १ डिसेंबर रोजी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्या भाजपावर नाराज असल्याची चर्चा होती. तसंच त्या वेगळा निर्णय घेऊ शकतात अशीही चर्चा होती. मात्र पंकजा मुंडे यांनी असा कोणताही निर्णय घेतला नाही. भाजपा हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे मी या पक्षापासून वेगळी होणार नाही. पक्षाला काही निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांनी खुशाल घ्यावा असं म्हणत पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मनात असलेली खदखद बोलून दाखवली. एवढंच नाही तर आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी टीका करताना देवेंद्र फडणवीस यांचं नाव टाळलं. मात्र त्यांचा रोख त्यांच्याकडे होता. मी आधी परळीची होते मात्र आता महाराष्ट्राची आहे असंही त्या म्हणाल्या. तसंच २६ जानेवारीपासून महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.

मात्र या सगळ्या गोष्टींवर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. ” पेल्यातलं वादळ पेल्यातच शमणार” अशी सूचक प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली. एवढंच नाही तर पाच वर्षे सत्ता असूनही भाजपा सरकार गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक उभारु शकलं नाही यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “माझ्या विरोधात असलेल्या नेत्याला रसद देण्यात आली असं पंकजा मुंडे म्हणाल्या. या त्यांच्या वक्तव्यावरुन आम्ही ताकदवान होतो हे तरी किमान त्या मान्य करतात. आमच्या हाती सत्ता नव्हती तरीही आम्ही सामर्थ्यशाली राहिलो”, यातच सगळं आलं असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.