‘मी पुन्हा येईन’ ही टॅगलाईन देवेंद्र फडणवीस यांना सतावत राहिल असं वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. “मी पुन्हा येईन ही कविता देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केली होती. त्यानंतर ही ओळ प्रचाराची टॅगलाईन म्हणून वापरण्यात आली. मात्र ज्या काही घडामोडी घडल्या आणि ज्यामुळे भाजपाला विरोधात बसावं लागलं त्यामुळे आता या टॅगलाईनची खिल्ली उडते आहे. देवेंद्र फडणवीस यांना ही टॅगलाईन आता पुढची पाच वर्षे तरी सतावत राहिल” असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

“मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री हे वाक्य मी बोललेच नव्हते. मात्र माध्यमांकडून मला हे वारंवार ऐकवण्यात आलं आणि अशा रितीने ऐकवण्यात आलं की मी काहीतरी पाप केलं आहे. अगदी तशाच प्रकारे मी पुन्हा येईन ही ओळ देवेंद्र फडणवीस यांना सतावणार आहे” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.  एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात जे काही राजकीय नाट्य घडलं त्यामुळे आम्हाला विरोधात बसावलं लागलं. पराभव झाल्यानंतर टॅगलाईनचीही खिल्ली उडते असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर याच मुलाखतीत त्यांनी इतरही अनेक बाबींवर भाष्य केलं. मी अस्वस्थ होते, मात्र मी पक्ष का सोडेन? माझ्याबाबत ज्या वावड्या उठवण्यात आल्या त्यामुळे जास्त अस्वस्थ झाले असंही त्या म्हणाल्या. तसंच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार स्थापन झालेलं पाहून मला धक्का बसला असंही त्या म्हणाल्या.