राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज्याच्या आणि देशाच्या जनतेला हे आवाहन केलं आहे की करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन बाहेर पडू नका. मी देखील घरातच बसलो आहे, घरात बसून मी वाचन करतो आहे आपल्या कुटुंबीयांची काळजी घेतो आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांचं काटेकोरपणे पालन करा असंही आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये आपणही घरी वाचन करत असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच अत्यंत महत्त्वाची गरज असल्याशिवाय बाहेर पडू नका असंही ते म्हणाले आहेत.

करोना व्हायरसची लढाई आपण जिंकणारच आहोत परंतु गरज आहे संयम, समंजसपणा आणि योग्य त्या दक्षता घेण्याची. मला विश्वास आहे याची गांभीर्याने दक्षता घ्याल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेला आज केले.

करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य व केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची गांभीर्याने नोंद घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. राज्यात जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अजूनही अनेक शहरात व काही ठिकाणी लोकं रस्त्यावर घोळक्यांनी बघायला मिळत आहे याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.