Bhayyuji Maharaj :राजकीय गुरु अशी प्रतिमा असलेले भय्युजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. राजकीय वर्तुळाला या बातमीने धक्का बसला आहे. कारण सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.

कोण होते भय्युजी महाराज?
भय्युजी महाराज यांचे मूळ नाव उदयसिंह देशमुख असे होते. वयाची चाळिशी गाठण्यापूर्वीच त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या असा दावा त्यांचे भक्त करत. नाथ संप्रदायातील कठोर व्रत आणि दत्तगुरुंना आपले गुरु मानणाऱ्या भय्युजी महाराजांनी दत्त संप्रदायाची शिकवण त्यांनी आपल्या आचरणातून समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. सीयाराम शुटिंगचे ब्रँड अँबेसेडर म्हणूनही त्यांनी सुरुवातीच्या काळात त्यंनी काम केले. चारचाकी वाहन चालवण्यात ते तरबेज होते. तसेच आधुनिक युगातील तंत्रज्ञानाचा त्यांनी मोकळेपणाने स्वीकार केला होता. राजकारणी, उद्योजक अशा अनेकांनी त्यांचे शिष्यत्त्व पत्करले होते. त्यांच्या शिष्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अभिनेता शेखर सुमन यांच्यासह अनेकजण त्यांचे शिष्य होते.

सूर्योदय चळवळ

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात त्यांनी सूर्योदय चळवळीतून मोठे सामाजिक कार्य केले. सूर्योदय आश्रमाच्या माध्यमातून शेतीच्या विकासासाठी कृषी तीर्थ प्रकल्प, पर्यावरण संवर्धनासाठी सूर्योदय ग्राम समृद्धी योजना, सूर्योदय स्वयंरोजगार योजना, तीर्थ क्षेत्र स्वच्छता अभियान, दारिद्र्य निर्मूलन अभियान, एड्स जनजागृती अभियान, संस्कार कला, क्रीडा आदी प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे राबवले. त्यांना सगळेच जण संत मानत असले तरीही भय्युजी महाराजांनी कधीही स्वतःला देव म्हणून संबोधले नाही. वैचारिक अधिष्ठान असल्याने लोक त्यांच्याकडे आकर्षित होत होते. खरे तर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात यशस्वी मॉडेल म्हणून केली होती. मात्र ते यशस्वी आयुष्य जगत असताना त्यांना आपल्या अज्ञात शक्तींची जाणीव झाली. त्याचमुळे त्यांनी मॉडेलिंगमधून संन्यास घेतला आणि सहा महिने अज्ञातवासात घालवले. या काळात भरपूर वाचन आणि चिंतन केल्यावर दैवी आशीर्वाद घेऊन ते संत म्हणूनच जगाच्या समोर येईल. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते. त्याच वैफल्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त होतो आहे.