News Flash

Street Food : स्वच्छतेच्या निकषांबाबत सरकार अपयशी ठरतंय असं वाटतं का?

वारंवार अशा प्रकारचे व्हिडिओ समोर येतात मात्र त्याबाबत ठोस उपाय योजना होताना दिसत नाहीत त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो आहे

आज सकाळीच एका व्हायरल व्हिडिओतून बोरीवली येथील एका इडलीवाल्याची बातमी समोर आली. हा इडलीवाला चटणीसाठी टॉयलेटमधलं पाणी वापरत असल्याचं व्हिडिओतून स्पष्ट होतं आहे. मात्र असा काही प्रकार समोर यायची ही पहिली वेळ नाही. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. प्रश्न निर्माण होतो तो सरकार या सगळ्यावर अंकुश ठेवण्यात खासकरून स्वच्छतेचे आणि आरोग्याच्या निकषांबाबत अपयशी ठरतं आहे का? कारण याआधी पाणीपुरीचं पीठ पायाने तुडवण्याची घटना असेल किंवा अगदी झोमॅटोच्या डिलिव्हरी मॅनने अन्न फोडून त्याची चव घेण्याचा प्रकार घडला असेल अशा अनेक घटना घडतात. त्यावर त्यावेळी कारवाई होते. मात्र पुढे ठोस उपाय म्हणावेत असे काहीही योजले जात नाहीत.

अशाच काही घटनांचा आढावा! 

जानेवारी महिन्यात पिंपरी चिंचवड शहरातला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये पाणी पुरीचे पीठ कामगार पायाने तुडवत असल्याचं समोर आलं होतं. एका पत्र्याच्या शेडमध्ये हे कामगार पाणी पुरीचे पीठ पायाने तुडवत असल्याचा हा प्रकार समोर आला होता. ही बातमी लोकसत्ता ऑनलाईनने दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एफडीआयने या ठिकाणी धाड टाकली. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करेपर्यंत व्यवसाय बंद करू असे सांगितले. याच धाडीत दोघांकडे व्यवसायाचा परवाना नाही ही बाबही लक्षात आली. पिंपरी चिंचवडमध्ये त्यानंतर धाडसत्रही राबवलं गेलं.

पाणीपुरी कारखान्यांवर छापे

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान, पुरीचे पीठ पायाने तुडवत असल्याचा व्हिडिओ आला समोर

त्यानंतर मार्च महिन्यात कुर्ला स्थानकातल्या एका स्टॉलवर गलिच्छपणे लिंबू सरबत तयार केलं जात असल्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यानंतर मध्य रेल्वेला जाग आली आणि त्यांनी खुल्या सरबत विक्रीवर बंदी घातली. मात्र ती काही दिवसांपुरतीच मर्यादित राहिली. आता विकल्या जाणाऱ्या सरबतांमध्ये निकृष्ट दर्जाचा बर्फ नसेलच हे सांगता येत नाही.

रेल्वे स्थानकांवरील खुल्या सरबत विक्रीवर बंदी, व्हायरल व्हिडीओनंतर मध्य रेल्वेचा निर्णय

पिंपरीच्या आधी २०१७ मध्येही अशाच प्रकारची एक बातमी मुंबईतून समोर आली होती. अन्न आणि औषध प्रशासनाने मानखुर्द, गोवंडी या ठिकाणी पाणी पुरी तयार करणाऱ्या कारखान्यांवर धाडी टाकल्या. ज्यामध्ये पाणी पुरीच्या पुऱ्या फरशीवर लाटल्या जात असल्याचे समोर आले होते. मैदाही जमिनीवरच मळला जात होता. काही वर्षांपूर्वी ठाण्यातलाही एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यात पाणी पुरीचे पाणी ज्या भांड्यात ठेवले जाते त्यात तो विक्रेता लघुशंका करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. मुंबईतही २०१७ मध्ये कारवाई करण्यात आली. सध्या काय सुरू आहे, असे कारखाने दुसरीकडे गेले आहेत का? तिथे अशाच पुऱ्या लाटल्या जात आहेत का हे सांगता येणं कठीण आहे.

२०१८ च्या डिसेंबर महिन्यात झोमॅटोच्या एका डिलिव्हरी मॅनने ऑर्डरमधील पदार्थ खाल्ल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. सगळ्याच प्रसारमाध्यमांमध्ये यासंदर्भातल्या बातम्या आल्यानंतर या डिलिव्हरी मॅनला त्याची नोकरी गमवावी लागली. झोमॅटो इंडियाने ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती.

चोरुन डबा खाणाऱ्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयची अखेर गच्छंती

२०१८ च्याच ऑगस्ट महिन्यात चायनीजच्या गाड्यांवर मिळणारे चिकन मेलेल्या आणि रोगट कोंबड्यांचे असते हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या धाडींमधून समोर आले होते. स्वस्त आणि मस्त खायला मिळतं म्हणून चायनीजचा पर्याय अनेकजण निवडतात. रस्त्यावरचं चायनीज खाणाऱ्यांसाठी धक्कादायक अशीच ही बातमी होती.

खवय्यांच्या जिवाशी खेळ! मुंबईतल्या चायनीज गाड्यांवर कुजलेल्या कोंबड्यांचे चिकन

या सगळ्या घटनांवर नजर टाकली तर हेच दिसून येते की, वारंवार अशा घटना समोर येऊनही रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत काही कठोर नियम केले जात नाहीत. हे सरकारचं अपयश आहे का? हा प्रश्न निर्माण होतो आहे. एक स्वस्त पर्याय म्हणून रस्त्यावरच्या अन्नाकडे पाहिलं जातं ते अन्न निवडलं जातं. मात्र लोकांच्या पोटात जाणाऱ्या या अन्नामुळे त्यांचं आरोग्य बिघडू शकतं. कारण स्ट्रीट फूड विकणारे स्वच्छतेची तेवढी काळजी घेतीलच याची शाश्वती नसते. दंड करून, तात्पुरती शिक्षा भोगून हे सगळे प्रकार जैसे थे चालतात. त्यामुळे सरकारने आजच्या इडलीच्या व्हिडिओनंतर तरी किमान स्वच्छतेचे काही कठोर नियम घालून दिले पाहिजेत अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त होते आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 12:21 pm

Web Title: do you think the government is failing to meet the standards of cleanliness of street food
Next Stories
1 मद्यपींना सरकारची भेट; राज्यात ड्राय डेची संख्या घटणार
2 राज्यातले सिंचनाचे सगळे प्रकल्प पूर्ण करणार-गडकरी
3 राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक, विधानसभेची रणनीती ठरणार?
Just Now!
X