प्रबोध देशपांडे
अकोला : विदर्भातील करोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या अकोला शहरात सर्वोपचार रुग्णालयातील योद्ध्यांचा अविरत लढा सुरूच आहे. अकोल्यात करोनाचा शिरकाव होऊन आज, २६ मे रोजी ५० दिवस पूर्ण झाले. या कालावधीत व्यक्तीगत समस्या बाजूला सारत सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी रुग्णसेवेसाठी अक्षरश: झटत आहेत. करोना विरूद्धचे युद्ध अद्याप संपले नसून, या लढ्यात पूर्ण शक्तीने डॉक्टर वर्ग आपले कर्तव्य बजावत आहेत.

अकोला शहरासह जिल्ह्यात करोनाचा झपाट्याने प्रसार झाला. अकोल्यात ७ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आला. ५० दिवसांत ही रुग्ण संख्या ४३५ वर पोहोचली. यातील २८ रुग्णांचा मृत्यू झाला, तर २८९ जणांनी करोनावर मात केली. जिल्ह्यातील करोना उपचाराचा संपूर्ण भार सर्वोपचार रुग्णालयावर आहे. रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी २४ तास आपली अविरत सेवा देत आहे. वाढीव रुग्ण संख्या लक्षात घेत ‘सर्वोपचार’वरील ताण प्रचंड वाढत आहे. अशा विपरित परिस्थितीमध्ये डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी थेट करोनाग्रस्तावर उपचार करून ‘फ्रंटलाइन’वर कार्य करीत आहेत.

अत्यल्प मनुष्यबळामुळे १६ ते १८ तास पीपीई कीट घालून डॉक्टरांना कार्यरत रहावे लागत आहे. करोना महामारीच्या काळात शासकीय महाविद्यालयातील अनेक डॉक्टर जीवपणाला लावून रुग्णांवर उपचार करीत आहेत. अधिष्ठाता डॉ. के.एस. घोरपडे यांच्या नेतृत्वात उपअधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ.अपूर्व पावडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, डॉ. प्रदीप उमप, डॉ. दिनेश नैताम, डॉ. अपर्णा वहाने, डॉ.मधुरा महाशब्दे, डॉ. गजानन अत्राम, पथकाचे समन्वयक डॉ.कृष्णमुरारी शर्मा, डॉ. महेश पुरी, डॉ. उमेश कवळकर, डॉ.अश्विनी पाटेकर, डॉ. गरिमा तिवारी, डॉ.यामिनी धाकडे आदी प्रमुख डॉक्टरांचा चमू सूक्ष्म नियोजन करून करोनाविरूद्ध लढा देत आहेत. यामध्ये त्यांना कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांचीही समर्थ साथ मिळते.

करोनाबाधितांवर उपचारदरम्यामन नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्डबॉय आदी वैद्याकीय कर्मचाऱ्यांनीही मोठा वाटा उचलला. कार्यालयीन कामाची जबाबदारी प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख व त्यांना कर्मचारी वर्ग पार पाडत आहे. अनेक डॉक्टर, वैद्याकीय कर्मचाऱ्यांना आरोग्य व कुटुंबाच्या समस्या आहेत. मात्र, कर्तव्य बजावताना त्या बाजूला ठेऊन हे करोना योद्धे आपली सेवा देत आहेत. या माध्यमातून त्यांनी समर्पित होऊन कार्य करण्याचा एक आदर्शच समाजापुढे ठेवला आहे.

पश्चिम वर्‍हाडातील करोना तपासणीचा भार
पश्चिम वर्‍हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील करोना तपासणीचा भार सर्वोपचार रुग्णालयातील प्रयोगशाळेवर आहे. सध्या २४ तासांत ३०० पेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी करून अहवाल दिले जात आहे. त्यासाठी विभाग प्रमुख डॉ.नितीन अंभारे व त्यांचा चमू अविरत झटत आहे.

६६.४३ टक्के रुग्ण करोनातून बरे
अकोला जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असली तरी सर्वोपचार रुग्णालयातील योग्य उपचारातून करोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. ४३५ रुग्ण आढळून आले, त्यापैकी ६६.४३ टक्के म्हणजे २८९ रुग्ण बरे झाले आहेत.

करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे वैद्यकीय महाविद्यालयावर मोठा ताण आहे. अशा संकटाच्या परिस्थितीत सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी अत्यंत निष्ठेने कार्यतत्पर राहून आपली सेवा देत आहेत.
– डॉ.के.एस.घोरपडे, अधिष्ठाता, शायकीय वैद्यकीय महाविद्यालय,अकोला.