वणी येथे एका खासगी दवाखान्यात रूग्ण बनून आलेल्या तरूणांनी डॉक्टरांवर चाकूने वार करीत हल्ला केला. ही घटना आज सोमवारी दुपारी एकच्या वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात डॉ. पद्माकर मत्ते हे गंभीर जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय उपचाराकरीता नागपूर येथे हलविण्यात आले आहे. हल्ला झाला त्यावेळी चार तरूण दवाखान्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

वणीतील रामपुरा वॉर्डात डॉ. पद्माकर मत्ते यांचा दवाखाना आहे. आज दुपारी एका मोटरसायकलवर तीन तरूण दवाखान्यात आले. यातील दोन तरूण तपासणीसाठी डॉक्टरांच्या कक्षात गेले व बाहेर असणाऱ्या तरुणासोबत अन्य एक तरुण येऊन मोटरसायकलवर बसून राहिला. आत गेलेल्या दोन तरूणांनी जवळच्या चाकूने डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर सपासप वार केले. या हल्याने गोंधळलेल्या डॉ. मत्ते यांनी आरडाओरड करताच रूग्णालयातील कर्मचारी, इतर रूग्ण त्यांच्या मदतीसाठी धावून आले. या गोंधळात हल्लेखोर तरूण व मोटरसायकलवर बसून असलेले दोघे तरूण पळून गेले. यावेळी मोटरसायकल सुरू न झाल्याने तरूणांनी ती दवाखान्यासमोर टाकून पळ काढला. हल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे डॉ. मत्ते यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना प्रथम वणीच्या एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हल्लेखोर युवकांचा युद्धपातळीवर शोध सुरू केला.

काही महिन्यांपूर्वी डॉ. मत्ते यांच्या रूग्णालयातून उपचार घेऊन घरी परत गेलेल्या एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृत युवकाचा भाऊ व नातेवाईकांनी डॉ. मत्ते यांच्या रूग्णालयात गोंधळ घालून तोडफोड करीत डॉ. मत्ते यांना मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी संबंधित मृत रूग्णाच्या भावास अटक केली होती. त्या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी डॉ. मत्ते यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला असून, चार संशयित युवकांना ताब्यात घेतले आहे,अशी माहिती वणीचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी दिली. या घटनेने वणीसह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरून गेले आहे.